मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गांवर खड्डे भरणीची कामं केली असली तरी पावसामुळे बुजवलेले खड्डे (Potholes) पुन्हा उखडू लागल्याचं चित्र आहे. यामुळे खड्डे भरणीच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक आणि जुना आग्रा मार्गावरील कशेळी-काल्हेर मार्गावर पावसामुळे खड्डे पडले होते. हे मार्ग ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानले जातात. खड्ड्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांसंदर्भात नेटकरी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत असतानाच अभिनेता सुमीत राघवननेही (Sumeet Raghvan) ट्विट केलं आहे.
‘संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्ते गुळगुळीत करण्याचा आणि वर्षभर एकही खड्डा न पडून देण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा. या सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे. दिलासा द्या,’ असं ट्विट एका नेटकऱ्याने केलं आहे. याच ट्विटला शेअर करत सुमीत राघवनने ट्विट केलं आहे. ‘अनुमोदन. आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो,’ असं सुमीतने या ट्विटमध्ये म्हटलंय. या ट्विटमध्ये सुमीतने मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग केलं आहे.
अनुमोदन. @CMOMaharashtra आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट ह्या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो. https://t.co/P1QXQBiDsg
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 22, 2022
खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि एमएमआरडीसी या प्राधिकरणांना स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याने त्यांच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.