अनेकदा आई किंवा वडील हे कलाविश्वात कार्यरत असले की त्यांची मुलंसुद्धा पालकांच्या पावलांवर पाऊल टाकत कलाविश्वात करिअर करण्याचा निर्णय घेतात. अर्थात यात बरेच अपवादात्मक उदाहरणंसुद्धा पहायला मिळतात. आई किंवा वडील अभिनय क्षेत्रात करिअर करत असले तर मुलांना त्यात फारसं रस नसतं. अशा वेळी हे स्टारकिड्स (Starkids) दुसऱ्या क्षेत्रातही नाव कमावताना दिसतात. मराठी कलाविश्वातील (Marathi Film Industry) बऱ्याच कलाकारांची मुलं या दृष्टीने पाऊल टाकताना दिसली. दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांची लेक वैमानिक आहे. तर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा शेफ आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत माईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) यांचा मुलगासुद्धा अभिनय नव्हे तर दुसऱ्या क्षेत्रात करिअर करत आहे.
सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर हा एक शेफ आहे. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या ‘खाना खजाना’ या शोमध्ये त्याने भाग घेतला होता. काही काळ त्याने अमेरिकेतही शेफ म्हणून काम केलं. मायदेशी परतल्यानंतर त्याने स्वत:चा एक छोटा व्यवसाय सुरु केला आहे. ‘मharaj’ असं त्याच्या फूड ट्रकचं नाव असून खवय्यांना तो त्याच्या हातची स्पेशल पावभाजी चाखायला देतो. जुलै महिन्यातच या व्यवसायाची सुरुवात झाली असून ठाण्यात हा फूड ट्रक चालवण्यात येतो. यात मिहिरचा मित्र आदेशनंही त्याला साथ दिली आहे.
सुप्रिया पाठारे यांनी ‘जागो मोहन प्यारे’, ‘श्रीमंताघरची सून’, ‘फू बाई फू’, ‘बाळकडू’ अशा विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. आज मराठी कलाविश्वात त्यांनी आपलं नाव कमावलं असून त्यांचा इथपर्यंतचा प्रवास मात्र सोपा नव्हता. चार भावंडांमध्ये मोठ्या असलेल्या सुप्रिया यांनी घरात मदत व्हावी म्हणून अंडी विकणे, चणे विकणे, कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी नेऊन पोहोचवणे यांसारखी कामंही केली आहेत.