मुंबई : ‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनि सोवळे ठेवले घालुन घडी। हाती घेतली मशाल तमाशाची लाज लावली देशोधडी!’ असा आत्मगौरव करत तमाशा कलेला सुवर्णयुग दाखवणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या नावाचा विसर महाराष्ट्राला कधीच पडू शकत नाही. तमाशाने झपाटलेली असामी असं शाहीर पठ्ठे बापूराव यांच वर्णन केलं तर ते चुकीच ठरणार नाही. आजचा पैसा उद्या पाहायचा नाही आजची लावणी उद्या गायची नाही या तत्वाशी एकनिष्ठ असणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांनी स्वत:चे काव्य व पहाड़ी आवाज या जोरावर तमाशाला नवे वळण दिले.
त्यांनी आपल्या हयातीत 2 लाखांहून अधिक लावण्या लिहिलेल्या आहेत. लावण्यांचे विद्यापीठ असलेल्या या शाहीराची सांगीतिक यशोगाथा आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. दिग्दर्शक मिलिंद कृष्णा सकपाळ यांनी या चित्रपटाचे शिवधनुष्य पेलले आहे. कांतीलाल भोसले, निलेश बबनराव देशमुख, रोहन अरविंद गोडांबे चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘द मॉर्निंगस्टार फिल्म कंपनी’ ‘असमथी प्रोडक्शन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार आहे.
प्रा.चंद्रकुमार नलगे यांच्या “महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव” आणि “पठ्ठे बापूरावांच्या शोधात” या पुस्तकांवर आधारित हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा राहुल डोरले यांची आहे. गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखनीतून गीते शब्दबद्ध केली जाणार आहेत. छायांकन केको नाकाहारा यांचे आहे. प्रोडक्शन डिझायनर संतोष फुटाणे तर मेकअप अँड हेअर डिझायनर विक्रम गायकवाड आहेत. कॉस्ट्यूम डिझायनर सचिन लोवलेकर तर साउंड डिझायनरची जबाबदारी मंदार कमलापूरकर सांभाळणार आहेत. सुपर वाइजिंग प्रोड्युसर भास्कर पावस्कर आहेत.
सांस्कृतिक परंपरेतील महाराष्ट्राची एक प्रमुख ओळख म्हणजे लावणी. या लावणीच्या शृगांराचे सौंदर्य खुलवण्याचे काम शाहीर पठ्ठे बापूराव यांनी केले. श्रीधर कृष्ण कुलकर्णी ते शाहीर पठ्ठे बापूराव हा त्यांचा कलंदर प्रवास नेमका कसा झाला ? हे या चित्रपटातून रसिकांसमोर येणार आहे. या संगीतमय चित्रपटाच्या संगीताचा प्रवास नेमका कसा असणार? आणि कोणता संगीतकार हे शिवधनुष्य लीलया पेललणार हे अजून गुलदस्त्यात आहे. लवकरच याबातची घोषणा करण्यात येणार आहे. शाहीर पठ्ठे बापूराव यांचा हा चित्रपट रसिकांसाठी लोककलावंतांसाठी एक अमूल्य भेट असेल हे नक्की!
स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!
Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?