गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live). या चित्रपटाचं नावच इतकं निराळं आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या 15 जुलै रोजी हा भव्य चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या संगीताची रसिकांवर भुरळ पडली आहे. आता ट्रेलरही प्रेक्षकांना आवडत असून हा काहीतरी भन्नाट विषय असल्याचं दिसतंय. यात सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वरचढ आहोत, हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु असून त्यात ‘ब्रेकिंग न्यूज’साठीची त्यांची धडपड, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा यात अधोरेखित होत आहे. आता यातून आणखी काही ‘ब्रेकिंग न्यूज’ आपल्या समोर येणार का, हे ‘तमाशा लाईव्ह’ पाहिल्यावरच कळेल. यात सिद्धार्थ आणि हेमांगीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारी गाणी कथा पुढे नेणारी आहेत. त्यामुळे या चित्रपटात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय.
दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ” यात मी थोडा वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय. संगीताच्या माध्यमातून हा चित्रपट पुढे जाणारा असून यातील प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा आहे, जी चित्रपटाला पुढे नेते. याचं श्रेय मी संगीत टीमला देईन. कारण यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक सीनला साजेसं गाणं, संगीत त्यांनी दिलं आहे. लोककलेला आधुनिकतेचं स्वरूप देण्यात आलेल्या ‘तमाशा लाईव्ह’ची कथा एका अशा वेगळया वळणावर जाणार आहे, ज्याचा शेवट अतिशय रंजक असणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपली व्यक्तिरेखा उत्कृष्ट सादर केली आहे. आमचा हा प्रयोग प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा आहे.”
‘प्लॅनेट मराठी’ चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “नजरेसमोर असलेली संकल्पना चित्रपटात प्रत्यक्ष उतरवणं, हे खूप कठीण काम आहे आणि हेच काम संजय जाधव उत्तम करतात. त्यांचा कागदावर जो चित्रपट असतो तोच अगदी हुबेहूब पडद्यावर असतो. म्हणूनच प्रेक्षकांना त्यांचे चित्रपट विशेष आवडतात. यात अनेक प्रयोग केले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’च्या निमित्ताने सोनाली, सचित, सिद्धार्थ यांनी गायकाची भूमिकाही साकारली आहे. आधुनिक विषय असलेला हा एक संगीतमय चित्रपट असून प्रत्येक गाण्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. या ट्रेलरने चित्रपट पाहाण्याची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. या चित्रपटाचा भाग होणे, ही आमच्यासाठीही आनंदाची गोष्ट आहे. ‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच नवीन आशयाच्या शोधात असल्याने आम्ही अशा वेगळ्या विषयांना नेहमीच उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. दर्जेदार आशयसह प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्टय आहे. त्यामुळे उत्तमोत्तम कलाकृती केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता त्याचा आनंद देशातील, परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी), माऊली प्रॉडक्शन्स, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. चित्रपटाचं संगीत अमितराज व पंकज पडघन यांचं असून गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. उमेश जाधव यांचं ‘तमाशा लाईव्ह’ला नृत्य दिग्दर्शन लाभलं आहे.