सलील कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित आणि सुमीत राघवन (Sumeet Raghvan), उर्मिला कोठारे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘एकदा काय झालं’ (Ekda Kaay Zala) या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. सुमीतने आजवर विविध भूमिकांमधून अनेकदा प्रेक्षकांना हसवलं आहे. मात्र त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणतोय. या चित्रपटात वडील आणि मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा मांडण्यात आली आहे. प्रेक्षकांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीसुद्धा चित्रपटासाठी खास ट्विट केलं आहे. सुमीतने केलेल्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट लवकरच पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
‘साराभाई व्हर्सेस साराभाई असो, वागळे की दुनिया असो किंवा मग बडी दूर से, माझ्या प्रोजेक्ट्सने नेहमीच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं. पण सध्या मी डोळ्यांत अश्रू असलेल्या लोकांना भेटतोय. अनेक क्षण, प्रतिक्रिया, शब्द हे कायमचे माझ्या मनात कोरले गेले आहेत, पण हे दोन फोटो माझ्यासोबत नेहमीच राहतील’, अशी पोस्ट लिहित सुमीतने हे फोटो पोस्ट केले आहेत.
Tears never lie. Heard amazing stuff about this brilliant, heartfelt film #EkdaKaayZala of @sumrag, directed by Salil Kulkarni. I was supposed to see it but had to travel. Looking forward to watching ASAP. https://t.co/5JJlsDXVya
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 22, 2022
सुमीतच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, ‘अश्रू कधीच खोटं बोलत नाहीत. सुमीत राघवनच्या या हृदयस्पर्शी आणि अप्रतिम चित्रपटाबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. मला हा चित्रपट पाहायचा होता, पण प्रवासात असल्याने पाहू शकलो नाही. लवकरच मी हा चित्रपट पाहीन.’
एकदा काय झालं या चित्रपटात सुमीत राघवन, उर्मिला कोठारे आणि बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. यांसोबतच मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.