मुंबई : ज्या मराठी माणसाचे आणि नाटकाचे अतूट नाते आहे त्या नाट्यरसिक आणि रंगदेवतेची राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक महिने ताटातूट झाली. आता मोठ्या संघर्षानंतर 22 ऑक्टोबरपासून रंगभूमीचा पडदा उघडणार असल्याच्या निमित्ताने वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे त्याचा आनंद साजरा करीत मराठी नाटकाचा पहिला प्रयोग समारंभपूर्वक रंगणार आहे.
अनलाँक 2 सुरू होऊन अनेक क्षेत्रांना मुभा देण्यात आली, तरी नाट्यगृहाचा पडदा मात्र उघडण्यास काहीसा उशीरच झाला आहे. त्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली. त्यांनी सरकार विरोधात आंदोलन केले तिथेही सरकारने त्यांची उपेक्षाच केली. या मराठी कालावंताच्या लढ्यात सहभागी होऊन त्यांच्या संघर्षाला पाठबळ देणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी समारंभपुर्वक नाटकाला आता सुरुवात करायचे ठरवले आहे.
22 आक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे या निमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांच्या गाजलेल्या “एका लग्नाची पुढची गोष्ट” या नाटकाचा एक खास प्रयोग ठेवण्यात आला आहे. यावेळी शासनाच्या नियमितपणे 50 टक्के क्षमतेनेच विनामूल्य प्रवेश रसिकांना देण्यात येणार असून, रेड कार्पेट अंथरून व गुलाबाचे फुल देऊन नाट्य रसिकांचे स्वागत करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी काही मराठी कलावंताना देखील खास आमंत्रित करण्यात येणार आहे.
तसेच, गेल्या पावणेदोन वर्षात मराठी रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलावंत, तंत्रज्ञ यांची ससेहोलपट झाली. त्यांना अनेक संस्था आणि व्यक्तींनी त्यांना मदत केली. यामध्ये अभिनेते प्रशांत दामले, अशोक हांडे यांच्यासह काही सामाजिक संस्थांचा सहभाग होता. यातील काही व्यक्ती आणि संस्थांचा प्रतिनिधीक सत्कार ही यावेळी करण्यात येणार आहे.
कोव्हिड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने काढलेल्या आदेशान्वये लागू केलेले विविध निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भात या क्षेत्रातील विविध संघटना आणि संस्थांकडून शासनाला विनंत्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार नियम पाळून नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
Death Anniversary | किशोर कुमार यांना आधीच आला होता मृत्यूचा अंदाज, गंमतीत बोलले अन् खरी झाली घटना!