‘समरेणू’तील (Samrenu) सम्या आणि रेणू प्रेक्षकांसमोर आल्यानंतर आता चित्रपटातील खलनायक संत्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतेच ‘संत्या’ या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. संत्या ही व्यक्तिरेखा भरत लिमण (Bharat Liman) साकारत असून तो प्रत्यक्षातही पैलवान आहे. महेश डोंगरे दिग्दर्शित ‘समरेणू’ या चित्रपटात महेश डोंगरे, रुचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘समरेणू’बद्दल अजित पवार म्हणाले, ” महेश डोंगरे यांचा दिग्दर्शक, अभिनेता म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे त्यांच्या पदार्पणासाठी त्यांना शुभेच्छा तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा. एक वेगळा विषय असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.”
दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणाले, ”आज महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांच्या हस्ते ‘संत्या’च्या पोस्टरचे अनावरण झाले आहे. संत्याची या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या ‘समरेणू’ची टॅगलाईनच ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय’ अशी आहे त्यामुळे या चित्रपटाचा शेवट पाहणे, खूप औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रेक्षकांनी सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीचा शेवट काय होतो, हे जाणून घेण्यासाठी ‘समरेणू’ नक्की पाहावा.”
एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन महेश डोंगरे यांनीच केले आहे. या चित्रपटाचे संगीत सूरज- धीरज यांचे असून त्या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन,आदर्श शिंदे आणि अजय गोगावले या गायकांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.
पोस्टर प्रदर्शनाबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, ” या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मी उत्सुक आहे. याचे कारण हे निर्माते माझ्या जिल्ह्यातील आहेत आणि या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बीड जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यात खूप कष्टकरी लोक आहेत, जे विविध राज्यात कामानिमित्ताने जातात. त्यांच्यात हुशारी असल्याने त्यांनी आपला ठसा विविध ठिकाणी उमटवला आहे. हा चित्रपट सफल व्हावा, याकरता मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते.”
हेही वाचा:
Ranbir Alia Wedding: “लवकरच बाबा हो आणि..”; लग्नाच्या चर्चांवर संजय दत्तचा रणबीर कपूरला सल्ला
“.. म्हणून मी अद्याप ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिला नाही”; सोनू निगमने सांगितलं कारण