प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिलेला शब्द पाळला; पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या सुनिताला मिळालं हक्काचं घर

| Updated on: Nov 04, 2024 | 9:04 AM

अपंगत्वावर मात करून जिद्दीने आयुष्य जगणाऱ्या सुनिताची मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मोठी मदत केली. यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी सुनिता आणि तिची मुलं वन बीएचके घरात समाधानाने राहू शकत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भातील पोस्ट लिहिली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिलेला शब्द पाळला; पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या सुनिताला मिळालं हक्काचं घर
दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या मदतीने सुनिताला मिळालं हक्काचं घर
Image Credit source: Instagram
Follow us on

मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अपंगत्वावर मात करून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका जिद्दी महिलेला तिचं हक्काचं घर मिळवून दिलं. अपघातात हात गमावलेल्या सुनिताची पतीने साथ सोडली होती. मात्र तिने स्वत:च्या जिद्दीने परिस्थितीवर मात करत मुलांना शिकवलं आणि मोठं केलं. ‘हवाहवाई’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान टिळेकर यांनी सुनिताची भेट घेतली होती. तेव्हा तिने डोक्यावर कायमस्वरुपी हक्काचं छप्पर असावं, अशी इच्छा बोलून दाखवली होती. महेश टिळेकर यांनी आपल्या प्रयत्नांनी सुनिताला घर मिळवून दिलं. यासाठी त्यांनाही बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्या सर्वांवर मात करत त्यांनी सुनिताचं स्वप्न पूर्ण केलं.

महेश टिळेकर यांची पोस्ट-

‘भगवान के यहां देर है अंधेर नहीं. माझ्या हवाहवाई सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मी आणि वर्षा उसगांवकर यांनी पुण्यात आपल्या अपंगत्वावर मात करून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जिद्दी महिलेची भेट घेऊन तिची प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियाद्वारे समाजापुढे मांडली होती. सुनिताला शक्य तितकी मदत मी केली, तिच्या घरी मी आणि वर्षा उसगांवकर गेलो होतो. तेव्हा तिने एक इच्छा व्यक्त केली की कुठे तरी भले एक खोली का असेना तिच्या डोक्यावर कायमस्वरूपी हक्काचं छप्पर असावं. त्यासाठी सरकारी योजनेतून मार्केट रेटपेक्षा स्वस्त घर मिळवण्यासाठी प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी घर मंजूर केलं. पण कागदपत्रे जमवताना अडचणी आल्या. स्थानिक नेत्याने मदत करतो असे बडेजाव करत सांगत सुनिताला महिनाभर चकरा मारायला लावून कामं केली नाहीच. तिचे फोन घेणंही टाळू लागला.’

हे सुद्धा वाचा

‘मग मी ज्या ज्या अधिकाऱ्यानां फोन केले, संपर्क साधला त्या प्रत्येकाने एका शब्दावर काम केलं. अडचणीतून मार्ग निघत गेला. सरकारी घर मंजूर झालं तरी ते फुकट नसल्याने बाहेरपेक्षा कमी असलं तरी पैसे भरावे लागणार होते. सुनिताला ती रक्कम ऐकून वाटले लाखो रुपये आणायचे कुठून. तिने घराची आशा सोडत “सर तुम्ही तरी किती करणार माझ्यासाठी..” असं म्हणत आशा सोडली. पण मी पैशांची व्यवस्था केली. सुनिताला फ्लॅटची चावी मिळाल्यावर सुनिताने माझ्यासमोर स्थानिक नेत्याला फोन केल्यावर त्याने “तुझं काम होणं अवघड आहे असं सांगितल्यावर मी फोनवरून त्याला पोटभर दिवाळीचा फराळ दिल्यावर मला समाधान मिळालं.” आज दिवाळी निमित्ताने पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी सुनिता हक्काच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये राहायला गेली. तिच्या नवीन घरात गेल्यावर तिचे आणि तिच्या मुलांचे दिवाळीतील दिव्यांपेक्षा जास्त उजळलेले चेहरे पाहून एका गरीबाच्या घरातील अंधार दूर करायला आपण निमित्त मात्र ठरलो यासाठी परमेश्वराचे आभार मानले,’अशी पोस्ट टिळेकर यांनी लिहिली.

टिळेकर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांनी केलेल्या परोपकारी कामाचं नेटकरी कौतुक करत आहेत.