अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. नीना गुप्ता या लवकरच आजी होणार आहेत. मसाबा आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही गोड बातमी सांगितली आहे. मसाबाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये गरोदर महिलेचा इमोजी पोस्ट केला आहे. त्यानंतर तिने आणखी काही इमोजी पोस्ट केल्यानंतर सत्यदीपसोबतचाही एक फोटो शेअर केला आहे. ‘दोन चिमुकले पाय आमच्या दिशेने येत आहेत. तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची खूप गरज आहे’, असं लिहित तिने आनंद व्यक्त केला. मसाबाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
करीना कपूर, परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, मीरा कपूर, शहनाज गिल, टिस्का चोप्रा, कुशा कपिला, सारा तेंडुलकर, गौहर खान यांसारख्या सेलिब्रिटींनी मसाबावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी खास कमेंट केली आहे. ‘काळजी करू नकोस मसू (मसाबा), जेव्हा आजी व्यस्त असेल तेव्हा तुझ्याकडे आणखी एक बेबी सिटर (बाळाची काळजी घेणारी) इथे आहे. आता मला थोडाफार अनुभवसुद्धा आला आहे’, असं त्यांनी लिहिलं आहे.
नीना गुप्ता यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित आजी होणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. ‘हमारे बच्चों का बच्चा आनेवाला है (आमच्या मुलांचं बाळ येणार आहे). यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असू शकते’, असं त्यांनी लिहिलं आहे. मसाबाने याआधी निर्माते मधू मंटेना यांच्याशी लग्न केलं होतं. तर सत्यदीप आधी अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत विवाहित होता. मात्र या दोघांचे घटस्फोट झाले. एकीकडे मधू मंटेना यांनी इरा त्रिवेदीशी दुसरं लग्न केलं. तर अदितीने नुकताच ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थशी साखरपुडा केला आहे.
मसाबा आणि सत्यदीप यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं. यावेळी मसाबाचे वडील विवियन रिचर्ड्स, सावत्र वडील विवेक मेहरा, आई नीना गुप्ता, सत्यदीपची आई आणि बहीण एकाच फ्रेममध्ये दिसले. फॅशन इंडस्ट्रीत मसाबाचं खूप मोठं नाव आहे. ‘हाऊस ऑफ मसाबा’ हा तिचा फॅशन ब्रँडसुद्धा प्रसिद्ध आहे. मसाबा ही नीना आणि माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. मात्र या दोघांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.