तुम्ही चित्रपटप्रेमी असाल तर आतापर्यंत मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (Ponniyin Selvan 1) याविषयी बरंच काही ऐकलं असाल. ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai Bachchan) महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाचं नाव ऐकून अनेकांना प्रश्न पडला आहे. बऱ्याच जणांना पोन्नियिन सेल्वनचा अर्थ माहीत नाही. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पहिल्याच दिवशी प्रेक्षक-समीक्षकांकडून चित्रपटाचं कौतुकसुद्धा झालंय. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दलची चर्चा ऐकून बरेचजण तो थिएटरमध्ये पाहण्यासाठी आतूर आहेत. थिएटरमध्ये हा बिग बजेट चित्रपट पाहण्याआधी त्याविषयी काही गोष्टी जाणून घ्या..
मणिरत्नम यांचा हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोन्नियिन सेल्वनमधील पोन्नी म्हणजे कावेरी नदीचा पुत्र. या चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये चोल साम्राज्य आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये होत असलेली लढाई दाखवण्यात आली आहे. दहाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर ही कथा आधारलेली आहे.
एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’सारखाच भव्यदिव्य हा चित्रपट असेल, असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र मणिरत्नम यांचा हा चित्रपट त्याही पुढचा आहे. कलाकारांची वेशभूषा, दागदागिने, चित्रपटाचा सेट, व्हीएफएक्स हे सर्व अत्यंत दमदार आणि आकर्षक पद्धतीचं आहे.
या चित्रपटाची तुलना ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय वेब सीरिजशी केली जात होती. मात्र त्यावर बोलताना मणिरत्नम म्हणाले, “पोन्नियिन सेल्वन हा गेम थ्रोन्सचा तमिळ व्हर्जन नाही तर गेम ऑफ थ्रोन्स हा पोन्नियिन सेल्वनचा इंग्लिश व्हर्जन आहे.” हा चित्रपट मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. मणिरत्नम यांचा हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ऐश्वर्या रायसोबतच चियान विक्रम, त्रिशा कृष्णन, प्रकाश राज, शोभिता धुलिपाला यांच्याही भूमिका आहेत.