अदितीने या अभिनेत्याशी केलं होतं पहिलं लग्न; आता तोच आहे प्रसिद्ध क्रिकेटरचा जावई

| Updated on: Sep 17, 2024 | 11:21 AM

अदिती आणि सिद्धार्थ यांचं हे दुसरं लग्न आहे. अदितीच्या पहिल्या लग्नाविषयी फार क्वचित लोकांना माहित आहे. कारण अदितीने तिच्या लग्नाची बातमी उघड केली नव्हती. मात्र घटस्फोटानंतर दोघांचं नातं सर्वांसमोर आलं होतं.

अदितीने या अभिनेत्याशी केलं होतं पहिलं लग्न; आता तोच आहे प्रसिद्ध क्रिकेटरचा जावई
Aditi Rao Hydari and Satyadeep Misra
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ यांनी सोमवारी सकाळी लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अदिती आणि सिद्धार्थ यांनी काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांनी तेलंगणामधील 400 वर्षे जुन्या मंदिरात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. अदिती आणि सिद्धार्थ या दोघांचं हे दुसरं लग्न आहे. याआधी सिद्धार्थने बालमैत्रीण मेघना नारायणशी लग्न केलं होतं. तर अदितीने अभिनेता सत्यदीप मिश्राशी पहिलं लग्न केलं होतं.

27 नोव्हेंबर 1972 रोजी जन्मलेल्या सत्यदीपने प्रतिष्ठित ‘द दून स्कूल’मध्ये शिक्षण घेतलं आणि दिल्ली विद्यापिठाच्या प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासात कला शाखेची पदवी प्राप्त केली. त्याच विद्यापिठातून त्यांनी कायद्याची पदव्युत्तर पदवीही घेतली. कायद्याचं शिक्षण घेत असतानाच त्याने नागरी सेवा पात्रता परीक्षा दिली आणि दहा महिने प्रशिक्षणसुद्धा घेतलं होतं. परंतु त्यानंतर नियुक्त झालेल्या प्राप्तिकर विभागात तो नोकरीला रुजू झाला नाही.

हे सुद्धा वाचा

अभिनेता होण्यासाठी तो 2010 मध्ये मुंबईत आला. त्याआधी दिल्लीत त्याने कॉर्पोरेट वकील म्हणून काम केलं. सत्यदीपने 2011 मध्ये ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘विक्रम वेधा’, ‘इल्लिगल’, ‘तनाव’, ‘जेहनाबाद- ऑफ लव्ह अँड वॉर’ आणि ‘पी. ओ. डब्ल्यू- बंदी युद्ध के’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

सत्यदीपने 2007 मध्ये अदिती राव हैदरीशी लग्न केलं. तेव्हा तो 35 वर्षांचा आणि अदिती 21 वर्षांची होती. हे दोघंही प्रख्यात त्याबजी-हैदरी कुटुंबातील आहे. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2013 मध्ये अदिती आणि सत्यदीप विभक्त झाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत अदिती या घटस्फोटाबद्दल म्हणाली, “आम्ही विभक्त झालो तेव्हा मी खूप खचले होते. परंतु फक्त आमच्या नात्याचं नाव बदललंय. आम्ही आताही चांगले मित्र आहोत. त्याच्या आईसाठी मी नेहमीच त्यांच्या मुलीसमान राहीन आणि माझ्या आईसाठी तो नेहमीच त्यांच्या मुलासमान राहील.”

सत्यदीपने आता प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताशी लग्न केलंय. ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. मसाबा ही वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांनी कधी लग्न केलं नाही. या वर्षी एप्रिल महिन्यात मसाबाने गरोदर असल्याचं जाहीर केलं.