दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि मेगास्टार चिरंजीवी यांचे पूर्व जावई शिरीष भारद्वाज यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. हैदराबादमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर फुफ्फुसांशी संबंधित समस्येमुळे उपचार सुरू होते. मात्र शिरीष यांच्या जवळच्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलंय. शिरीष यांनी चिरंजीवी यांची मुलगी श्रीजा कोनिडेलाशी 2007 मध्ये लग्न केलं होतं. श्रीजा आणि शिरीष यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. हे लग्न टॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेचा मोठा विषय ठरला होता. चिरंजीवी यांच्या मुलीने घरातून पळून जाऊन लग्न केल्याने या बातमीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाच्या घटनेमागे राजकीय प्रभाव असल्याच्याही जोरदार चर्चा होती.
श्रीजा आणि शिरीष यांनी प्रेमविवाह केला असला तरी त्यांचं नातं लग्नानंतर फार काळ टिकू शकलं नाही. मुलीच्या जन्मानंतर 2014 मध्ये हे दोघं विभक्त झाले. श्रीजाला घटस्फोट दिल्यानंतर शिरीष यांनी 2019 मध्ये दुसऱ्या महिलेशी दुसरं लग्न केलं. ते पेशाने वकील होते आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र राजकारणात फारसे सक्रिय न राहिल्याने त्यांचा राजकीय प्रवास तितका उल्लेखनीय ठरला नाही.
Rest in peace sirish pic.twitter.com/nins1IqxNt
— Sri Reddy (@SriReddyTalks) June 19, 2024
शिरीष यांना घटस्फोट दिल्यानंतर श्रीजानेही दुसरं लग्न केलं. 2016 मध्ये तिने बिझनेसमन कल्याण देवशी बेंगळुरूमध्ये लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगी आहे. मात्र श्रीजा आणि कल्याण देव यांचंही नातं फार काळ टिकलं नाही. गेल्या वर्षी या दोघांनी घटस्फोट घेतला.