क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आठवड्याभरातच आता पुन्हा एकदा राजघराण्यातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. राणीचा नातू प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल (Meghan Markle) यांना अंत्यदर्शनासाठी बोलावलं नसल्याची माहिती समोर आली आहे. मेगन आणि प्रिन्स हॅरी हे ससेक्सचे ड्युक आणि डचेस आहेत. राणीच्या अंत्यविधीपूर्वी बकिंगहॅम पॅलेसमध्ये अंत्यदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आमंत्रणांच्या गोंधळामुळे मेगन आणि प्रिन्स हॅरीला तिथे बोलावलं गेलंच नाही, असं कळतंय.
प्रिन्स हॅरी हा राणीचा पुत्र आणि नवीन राजा चार्ल्स तृतीय यांचा धाकटा मुलगा आहे. ‘द सूट’ या सीरिजमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मेगन मार्कलशी प्रिन्स हॅरीने लग्न केलं. 2018 मध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. मात्र लग्नानंतर काही काळाने या दोघांचा ब्रिटीश राजघराण्याशी वाद सुरू झाला. यावेळी मेगनने काही मुलाखतींमध्ये राजघराण्यावर गंभीर आरोप केले होते. अखेर 2020 मध्ये त्यांनी राजघराण्यातील पदावरून पायउतार केला आणि कॅलिफोर्नियामध्ये स्थलांतरित झाले.
टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, किंग चार्ल्स आणि क्वीन कॉन्सॉर्ट कॅमिला यांनी रविवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या रिसेप्शनला मेगन आणि हॅरी यांना आमंत्रित केलं गेलं नाही. अशी घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. असंही म्हटलं जातंय की राणीच्या अंत्यविधीला प्रिन्स हॅरी त्याचा लष्करी गणवेश घालू शकत नाही असं त्याला सांगण्यात आलं होतं. अखेर राजा चार्ल्स यांनी हस्तक्षेप केला आणि हॅरीला त्याचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यमसह लष्करी गणवेश घालण्याची परवानगी दिली. बकिंगहॅम पॅलेसच्या निवेदनात असं स्पष्ट केलं होतं की “राजाच्या विनंतीनुसार ते दोघंही गणवेशात असतील”.
सर्वात जास्त काळ राज्य करणारी ब्रिटनची राणी एलिझाबेथ II यांचं 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. त्या 70 वर्षांहून अधिक काळ युनायटेड किंग्डमच्या राणी होत्या. 1952 मध्ये त्यांचे वडील किंग जॉर्ज VI यांच्या निधनानंतर त्या सिंहासनावर आरूढ झाल्या होत्या.