‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 3’चा महाअंतिम सोहळा; कोण जिंकणार ट्रॉफी?

| Updated on: Nov 04, 2024 | 12:06 PM

'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 3'चा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. सहा स्पर्धकांमध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यापैकी कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 3चा महाअंतिम सोहळा; कोण जिंकणार ट्रॉफी?
'मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 3'चा महाअंतिम सोहळा
Image Credit source: Instagram
Follow us on

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’च्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून सहा सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 9 आणि 10 नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे.

पुण्याचा देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने, अहमदनगरचा सारंग भालके, यवतमाळची गीत बागडे, विरारची पलाक्षी दीक्षित आणि जुई चव्हाण या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. छोट्या उस्तादांना या पर्वात सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल दैदीप्यमान असणार यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा

महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी अभिजीत सावंत, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, राधा खुडे खास हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ जाधव देखील या महाअंतिम सोहळ्यात धिंगाणा घालणार आहे. टॉप सहा स्पर्धकांमध्ये सुरांची महाजुगलबंदी देखील रंगणार आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3’चा महाअंतिम सोहळा येत्या 9 आणि 10 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.