गायक आणि संगीतकार मिका सिंग याने नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. मिकाने 2020 मध्ये निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि त्यानंतर त्याने दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या ‘डेंजरस’ या सीरिजची निर्मिती केली. यामध्ये बिपाशा आणि करण यांच्या मुख्य भूमिक होत्या. त्यांच्यासोबत काम करताना अत्यंत नकारात्मक अनुभव आल्याचा खुलासा मिकाने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला.
मिका म्हणाला, “मला करण सिंह ग्रोवरसोबत एका नव्या अभिनेत्रीला घ्यायचं होतं, जेणेकरून प्रोजेक्टचा बजेट कमी असेल आणि त्यातून काहीतरी चांगलं काम करता येईल. पण अचानक बिपाशा बासूने त्यात उडी घेतली आणि आम्ही दोघं या सीरिजमध्ये काम करू शकतो, असं ती म्हणाली. यामुळे माझा बजेट वाढला नव्हता, पण त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच भयानक होता.”
या अनुभवाविषयी मिकाने पुढे सांगितलं, “मी 50 लोकांच्या टीमसोबत लंडनला शूटिेंगसाठी गेलो होतो. तिथे आम्ही महिनाभर शूटिंग करणार होतो. पण हा कालावधी वाढून दोन महिन्यांचा झाला. शूटिंगदरम्यान करण आणि बिपाशाने खूप ड्रामा केला. ते विवाहित होते, म्हणून मी त्यांच्याशी एकच रुम बुक केली होती. पण तरीसुद्धा त्यांनी दोन वेगवेगळ्या रुम्सची मागणी केली. मला त्यामागचं लॉजिक काही समजलं नाही. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट होण्याची मागणी केली. आम्ही तीसुद्धा मागणी ऐकली.”
सीरिजमधील एका स्टंटच्या शूटिंगदरम्यान करणचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर त्यांनी डबिंग करतानाही बऱ्याच समस्या निर्माण केल्याचं मिकाने सांगितलं. “आमचा घसा खराब आहे, यांसारखी त्यांनी विविध कारणं दिली. मला त्यांचा ड्रामाच समजत नव्हता. त्यांना त्यांच्या कामासाठी पैसेसुद्धा देण्यात आले होते. तरीसुद्धा त्यांनी काम नीट पूर्ण केलं नव्हतं. खऱ्या आयुष्यात दोघं पती-पत्नी असूनसुद्धा त्यांनी ऑनस्क्रीन एकमेकांना किस करण्यावरून ड्रामा केला होता”, असाही खुलासा मिकाने केला.