‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कारण ‘मिर्झापूर 3’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सीरिजविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यंदाच्या सिझनमध्ये कलाकार कोणते असतील? कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी ही सीरिज प्रदर्शित होईल? तिसऱ्या सिझनमध्ये मुन्ना भैय्या जिवंत असेल का? या सीरिजचे एपिसोड्स किती असतील? अशा सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. प्रेक्षकांकडून याविषयी गुगलवर सर्वाधिक सर्च केलं जातंय.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर ‘मिर्झापूर 3’ ही वेब सीरिज येत्या 5 जुलै रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजचे मागील दोन्ही सिझन सुपरहिट ठरले होते. म्हणून प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
या गँगस्टर ड्रामामध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा, रसिका दुग्गल यांच्या भूमिका आहेत. गुरमीत सिंहने या सीरिजचं दिग्दर्शन केलंय. त्याच्या प्रदर्शनाच्या वेळेबद्दल बोलायचं झाल्यास, या बहुप्रतिक्षित वेब सीरिजचे सर्व भाग मध्यरात्री स्ट्रीम केले जातील.
काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मिर्झापूरच्या पहिल्या सिझनचे एकूण नऊ एपिसोड्स होते. तर दुसऱ्या सिझनमध्ये दहा एपिसोड्स होते. आता ‘मिर्झापूर 3’मध्ये नऊ किंवा दहा एपिसोड्स असण्याची शक्यता आहे.
सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांच्या मनात एकच सवाल होता की तिसऱ्या सिझनमध्ये मुन्ना भैय्या दिसणार की नाही? तर तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना मुन्ना भैय्या दिसणार नाही. कारण दुसऱ्याच सिझनमध्ये त्याचं निधन झालं आहे. दिव्येंदु शर्माने ही भूमिका साकारली होती. तिसऱ्या सिझनमध्ये दिव्येंदु शर्मा, विक्रांत मेस्सी आणि श्रेया पिळगावकर आठ कलाकार दिसणार नाहीत. तर पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर, ईशा तलवार, विजय वर्मा आणि अंजुम शर्मा यांच्या त्यात भूमिका आहेत. यंदाच्या सिझनमध्ये ‘पंचायत’ फेम जितेंद्र कुमारसुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.