‘मिस इंडिया 2022’ (Miss India 2022) ही सौंदर्यस्पर्धा रविवारी 3 जुलै रोजी पार पडली आणि या स्पर्धेत 21 वर्षीय सिनी शेट्टी हिने (Sini Shetty) ‘मिस इंडिया’चा किताब पटकावला आहे. सिनी ही मूळची कर्नाटकाची (Karnataka) आहे. 2020 ची मिस इंडिया मानसा वाराणसी हिने आपला मुकूट सिनीला दिला. मुंबईतील जियो कन्वेन्शन सेंटर याठिकाणी स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. सिनी सध्या चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्टचा कोर्स करत आहे. मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर आता ती 71व्या मिस वर्ल्ड या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान, राजस्थानची रुबल शेखावत ही ‘मिस इंडिया 2022’ या स्पर्धेत फर्स्ट रनर ठरली आणि उत्तर प्रदेशची शिनाता चौहान ही सेकंड रनर अप ठरली.
मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री क्रिती सनॉन आणि लॉरेन गॉटलिएब यांनी या शोमध्ये परफॉर्म केलं. तर अभिनेता मनिष पॉलने या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. मिस इंडियाच्या परीक्षकांमध्ये नेहा धुपिया, डिनो मोरिया आणि मलायका अरोरा यांचा समावेश होता. इतकंच नव्हे तर क्रिकेटर मिताली राजसुद्धा परीक्षक होती. परीक्षकांच्या पॅनेलमध्ये राहुल खन्ना, रोहित गांधी आणि कोरिओग्राफर शामक दावर हेसुद्धा होते. मिस इंडियाचा ग्रँड फिनाले हा येत्या 17 जुलै रोजी कलर्स टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे.
सिनी शेट्टी 21 वर्षांची आहे. तिचा जन्म मुंबईत झाला पण ती मूळची कर्नाटकची आहे. तिने अकाऊंटिंग आणि फायनान्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. तर सध्या ती चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्टचा (CFA) कोर्स शिकत आहे. सिनीने वयाच्या चौथ्या वर्षापासून शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. वयाच्या चौदाव्या वर्षी तिने अरंगेत्रम आणि भरतनाट्यम पूर्ण केलं.