मुंबई : राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने ‘मिस इंडिया 2023’ या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचा किताब पटकावला आहे. रविवारी (15 एप्रिल) फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा ग्रँड फिनाले पार पडला होता. दिल्लीची श्रेया पूंजा ही या स्पर्धेत उपविजेती ठरली. तर मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग ही तिसऱ्या क्रमांकावर होती. मिस इंडियाच्या या विजयानंतर नंदिनी संयुक्त अरब अमिरातीत पार पडणाऱ्या 71 व्या मिस वर्ड सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
नंदिनी गुप्ताने अवघ्या 19 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला आहे. ती मूळची कोटा इथली आहे, जे इंजिनीअरिंग आणि मेडिकल श्रेत्रात शिकणाऱ्यांसाठी देशातील सर्वांत मोठं कोचिंग हब आहे. नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. ती रतन टाटा यांना सर्वांत प्रभावशाली व्यक्ती मानते. “ते मानवतेसाठी सर्वकाही करतात आणि जे मिळवतात त्यातून बहुतांश रक्कम ते दानधर्मासाठी वापरतात. लाखो लोक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचा आदर करतात”, असं नंदिनीने तिच्या मुलाखतीत म्हटलं होतं. याशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून प्रेरणा घेत असल्याचंही ती म्हणाली.
नंदिनीने 59 व्या मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे. या कार्यक्रमात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींनी परफॉर्म केलं होतं. तर मनिष पॉल आणि भूमी पेडणेकर यांनी या शोचं सूत्रसंचालन केलं.
मणिपूरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. गेल्या वर्षी विजेती ठरलेल्या सिनी शेट्टीने ‘मिस इंडिया’चा मुकूट नंदिनीकडे सोपवला. नंदिनीला लहानपणापासून मॉडेलिंगची आवड होती. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तिने मिस इंडियाचा किताब जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. फेमिना मिस इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नंदिनी गुप्ताचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.