मुंबई: अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रिएलने ‘मिस युनिव्हर्स 2022’चा किताब जिंकला. जगभरातील 84 स्पर्धकांना मात देत ती विजयी ठरली. मिस युनिव्हर्स हा सौंदर्यस्पर्धेतील सर्वांत प्रतिष्ठित किताब मानला जातो. हा किताब जिंकणाऱ्या स्पर्धकाला फक्त रत्नडजित मुकूट आणि बक्षिसाची रक्कमच नाही तर इतरही बऱ्याच सुविधा दिल्या जातात. मिस युनिव्हर्स जिंकणारी स्पर्धक या सुविधांचा उपभोग वर्षभर घेऊ शकते.
मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या स्पर्धकाला एक लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतं. मात्र स्पॉन्सर्स आणि इतर भेटवस्तू मिळून ही रक्कम आणखी वाढते. त्याचसोबतच मिस युनिव्हर्सला न्यूयॉर्कच्या मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष राहण्याची सुविधा मिळते. तिथे तिचे कपडे, मेकअप आणि किचनपर्यंत सर्व सुविधा या मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनकडून दिल्या जातात. यासोबतच ऑर्गनायझेशन मिस युनिव्हर्सला जगभरातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर्ससुद्धा उपलब्ध करून देते. हे फोटोग्राफर्स मॉडेलिंगसाठी तिचा पोर्टफोलियो तयार करतात.
“WHO ARE YOU?”#MISSUNIVERSE!!!!! pic.twitter.com/VScrfIsacr
— Miss Universe (@MissUniverse) January 15, 2023
मिस युनिव्हर्सच्या प्रवास आणि हॉटेलचा सर्व खर्चसुद्धा ऑर्गनायझेशनकडून दिला जातो. बक्षिसाची रक्कम आणि घराशिवाय तिला एक असिस्टंट आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टची एक संपूर्ण टीम दिली जाते. ही टीम तिच्या मेकअप, हेअर प्रॉडक्ट, चप्पल, कपडे, ज्वेलरी आणि स्कीन केअर अशा सर्व गोष्टींची काळजी घेते.
या सुविधांसोबतच मिस युनिव्हर्सला काही जबाबदाऱ्याही सोपवल्या जातात. ती मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनची मुख्य अॅम्बेसेडर असते. म्हणजेच तिला या ऑर्गनायझेशनकडून आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक पार्टीत, पत्रकार परिषदेत आणि चॅरिटी इव्हेंट्समध्ये आवर्जून हजेरी लावावी लागते.