Mission Raniganj | अंगावर काटा आणणारा ‘मिशन रानीगंज’चा ट्रेलर; नेटकऱ्यांकडून आताच राष्ट्रीय पुरस्काराची मागणी

| Updated on: Sep 25, 2023 | 6:57 PM

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या आगामी 'मिशन रानीगंज' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवळपास 2 मिनिटं 15 सेकंदांचा हा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. पश्चिम बंगालमधल्या रानीगंज याठिकाणी घडलेल्या सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे.

Mission Raniganj | अंगावर काटा आणणारा मिशन रानीगंजचा ट्रेलर; नेटकऱ्यांकडून आताच राष्ट्रीय पुरस्काराची मागणी
Mission Raniganj trailer
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटाचा चित्तथरारक ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार ट्रेलरने आताच प्रेक्षकांची मनं जिंकली असून अनेकांनी अक्षय कुमारसाठी राष्ट्रीय पुरस्काराची मागणी केली आहे. या ट्रेलरची सुरुवात एका भयंकर अपघाताने होते. एक खाण कोसळते आणि खाण कामगारांचा एक मोठा गट खाली अडकतो. त्यांचे प्राण वाचवण्याचं मोठं आव्हान समोर असतं. यामध्ये अक्षय कुमारने शीख अभियंताची भूमिका साकारली आहे. देशातील सर्वांत मोठं बचावकार्य तो सुरू करतो. पूरग्रस्त कोळसा क्षेत्रातून खाण कामगारांना वाचवण्यासाठी त्याच्याकडे फक्त 48 तासच शिल्लक असतात.

सत्य घटनेवर आधारित चित्रपट

या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. 1998 मध्ये पश्चिम बंगालच्या रानीगंजमधील एका कोळसा खाणीत मोठी दुर्घटना घडली होती. त्या घटनेनं संपूर्ण देश हादरलं होतं. तेव्हा इंजीनिअर जसवंत सिंह गिल यांनी अथक प्रयत्न करून 65 जणांचा जीव वाचवला होता. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हा निश्चय केला होता की ते सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढतील. यासाठी त्यांनी कोणता प्लॅन केला होता, तो अपघात कसा घडला आणि त्यानंतर खाण कामगारांना कसं वाचवलं गेलं, याची कथा ‘मिशन रानीगंज’मध्ये दाखवण्यात येणार आहे.

पहा ट्रेलर

हे सुद्धा वाचा

मिशन रानीगंज हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. ‘ब्लॉकबस्टर ट्रेलर’ असं एकाने म्हटलंय. तर ‘अंगावर काटा आणणारा ट्रेलर’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘अक्षय सर नेहमीच प्रेरणादायी चित्रपट घेऊन येतात’, असंही नेटकऱ्याने म्हटलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केलं आहे. चित्रपटात अक्षय कुमार, परिणीती चोप्रासोबतच कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, रवी किशन, वरुण बडोला, दिब्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा, विरेंद्र सक्सेना, शिषिर शर्मा, अनंत महादेवन, जमील खान, सुधीर पांडे, मुकेश भट्ट आणि ओमकार दास माणिकपुरी यांच्याही भूमिका आहेत.