मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई शांतिरानी चक्रवर्ती यांचं आज (शुक्रवार, 6 जून) निधन झालं आहे. मिथुन यांचा छोटा मुलगा नमाशी चक्रवर्तीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शांतिरानी यांच्या निधनामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तीन वर्षांपूर्वी 21 एप्रिल 2020 रोजी मिथुन यांचे वडील बसंतोकुमार चक्रवर्ती यांचं निधन झालं होतं. किडनी निकामी झाल्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. ते 95 वर्षांचे होते. आता आईच्या निधनानंतर ते पूर्णपणे खचले आहेत.
टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. ‘मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. देव मिथुन दा आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो’, अशा शब्दांत त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. मिथुन चक्रवर्ती सध्या ‘बांगला डान्स’च्या बाराव्या सिझनमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. या शोमधील संबंधित लोकांनीही मिथुन दा यांच्या आईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
बंगाल भाजपकडूनही शांतिरानी यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला आहे. मिथुन चक्रवर्ती हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान कोलकाता इथल्या ब्रिगेट मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बराच संघर्ष केला होता. ते जोराबागनमध्ये आईवडील आणि भावंडांसोबत राहायचे. मिथुन चक्रवर्ती हे मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबातून असून विविध मुलाखतींमध्ये ते नेहमीच आईवडिलांनी त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या भावंडांमध्ये रुजवलेल्या विचारसरणीबद्दल बोलले आहेत. आपल्याला उज्ज्वल भविष्य मिळावं म्हणून पालकांनी कसा संघर्ष केला, याबद्दलही ते अनेकदा व्यक्त झाले होते. जेव्हा मिथुन मुंबईत राहू लागले तेव्हा ते त्यांच्या आईला सोबत घेऊन आले होते. तेव्हापासून आई शांतिरानी चक्रवर्ती त्यांच्यासोबत मुंबईतच राहत होत्या.
मिथुन चक्रवर्ती हे सध्या ‘डान्स बांगला डान्स’ या बंगाली रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. जवळपास दहा वर्षांनंतर ते या शोच्या मंचावर परतले आहेत. याशिवाय त्यांनी ‘डान्स ज्युनियर डान्स’ या शोमध्येही हजेरी लावली होती.