मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : दिग्गज कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःला संपवलं आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. बुधवारी सकाळी नितीन देसाई यांनी स्वतःच उभारलेल्या स्टुडीओमध्ये स्वतःचं जीवन संपवलं आहे. कर्जत येथील एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी नितीन देसाई यांच्या निधनाचं कारण सांगितलेलं नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळ ४.३० च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं आहे.
आर्थिक तंगीमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा रंगत आहेत. कर्जत येथील आमदार महेश बालदी यांनी नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल मोठी माहिती दिली आहे. ‘आर्थिक तंगीमुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक तंगीचा ते सामना करत होते. म्हणून त्यांनी सकाळी एनडीए स्टुडिओमध्ये आत्महत्या केली..’ अशी प्रतिक्रिया महेश बालदी यांनी दिली आहे.
नितीन देसाई यांनी १९८९ मध्ये ‘परिंदा’ सिनेमातून त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांमध्ये नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शनाची भूमिका बजावली. एवढंच नाहीतर, ‘देवदास’, ‘खामोशी’ सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
बेस्ट कलादिग्दर्शक म्हणून नितिन देसाई यांनी चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २० वर्षांपेक्षा अधिक काळ नितीन देसाई यांनी कलाविश्वात काम केलं आहे. नितीन देसाई यांनी संजय लिला भंसाळी, विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारिकर यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत नितीन देसाई यांनी काम केलं आहे. अशात त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलीस घटनास्थळी पोहोले असून अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. प्रथम मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या निधनामागचं कारण समजू शकेल. अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, पोलिसांचा तपास सुरु आहे.