अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने इतिहास रचला. एस. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावला.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्ससुद्धा सादर कऱण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस हे मंचावर गेले. संपूर्ण भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता.
ऑस्करची ट्रॉफी स्वीकारल्यानंतर किरवाणी यांनी मंचावर भाषण दिलं. त्यांच्या याच भाषणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 'माझी एकच इच्छा होती. RRR ला जिंकायचंय, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे आणि ते मला सर्वोच्च पातळीवर घेऊन जाईल', असं ते म्हणाले.
या भाषणाची खास बात म्हणजे किरवाणी यांनी हे गाण्याच्या चालीत म्हटलं. संगीतकार असल्याने त्यांनी शब्दांमध्ये सूर गुंफून ऑस्करच्या मंचावर भाषण दिलं. त्यांच्या या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याचा हा दुसरा ऐतिहासिक विजय आहे. याआधी गाण्याने 'गोल्डन ग्लोब' हा प्रतिष्ठित पुरस्कारसुद्धा पटकावला होता.