मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन पबजी गेममुळे सीमा आणि सचिन यांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरु झाली. प्रेमासाठी सीमा चार मुलांसोबत पाकिस्तानातून भरतात आली आहे. आता दोघांच्या लव्हस्टोरीवर सिनेमा साकारणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यासाठी ऑडिशन देखील सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर, सीमा हिला अभिनय क्षेत्रात काम देणाऱ्या असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत. फायरफॉक्स प्रॉडक्शन सचिन आणि सीमा हैदर यांच्या प्रेमकथेवर सिनेमा बनवत आहे. एवढंच नाही तर, त्यांनी सीमाला ऑफर देखील दिली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी वक्तव्य केलं आहे.
अमेय खोपकर ट्विट करत म्हणाले, ‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत?’
पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 12, 2023
अमेय खोपकर पुढे म्हणाले, ‘हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!’ सध्या सर्वत्र खोपकर यांच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीमा हैदर हिने सिनेमात सलमान खान आणि सनी देओलसारख्या स्टार्ससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नुकताच, फायरफॉक्स प्रॉडक्शनचे निर्माते अमित जानी यांनी सीमा हैदरवर ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाची घोषणा केली होती. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नेपाळ येथून भारतात घुसखोरी करणारी सीमा हैदर आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एवढंच नाही तर, सीमाने भारतीय नागरित्व मिळावं अशी मागणी देखील केली आहे.