मुंबई: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाला भारतात प्रदर्शित होण्यास मनसेकडून विरोध करण्यात आला. फवादचा हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. चीड आणणारी बाब म्हणजे भारतीय कंपनी त्यासाठी पायघड्या घालतेय, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना संताप व्यक्त केला.
‘फवाद खानचा ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही,’ अशा इशारा त्यांनी दिला.
‘नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा,’ असंही त्यांनी म्हटलंय.
फवाद खानचा ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 9, 2022
नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 9, 2022
द लेजंड ऑफ मौला जट्ट हा पाकिस्तानी चित्रपट 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. जगभरात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरला आहे. हा लवकरच भारतातही प्रदर्शित केला जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. येत्या 23 डिसेंबर रोजी हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याचं समजतंय.
2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली. फवाद खानचा भारतात चाहतावर्ग आहे. त्याने 2014 मध्ये ‘खुबसूरत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘कपूर्स अँड सन्स’ या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली होती.