‘मोहब्बतें’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रिती झांगियानीचा पती परविन डबासचा 21 सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाला. या अपघातानंतर त्याला आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सुदैवाने चार दिवसांनंतर 25 सप्टेंबर रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर परवीनने त्या भीषण अपघाताच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्या अपघातानंतर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलला, याविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला. परविनने सांगितलं की त्याने आणि त्याच्या पत्नीने मुलांना अपघाताविषयी सांगितलं नव्हतं. त्यांना मित्रांकडून अपघाताविषयी समजलं होतं. त्यावेळी आपल्या वडिलांचं निधन झाल्याचं त्यांना वाटलं होतं, असं परविनने सांगितलं.
“माझ्या मुलाला त्याच्या एका मित्राकडून मेसेज आला होता. ‘तुझ्या वडिलांबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं’, असा तो मेसेज होता. हा मेसेज वाचून त्याला असं वाटलं होतं की माझं निधन झालंय. त्यानंतर प्रितीने त्यांना माझ्या अपघाताविषयी आणि माझ्या आरोग्याविषयीची माहिती दिली. तिने मुलाला शांत केलं. या अपघातामुळे माझा आयुष्याकडे आणि कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे”, असं परविन ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
या संपूर्ण काळात पत्नी प्रितीन कशाप्रकारे साथ दिली, याविषयीही तो व्यक्त झाला. “प्रितीने माझी खूप साथ दिली. तिने संपूर्ण परिस्थिती खूप व्यवस्थित हाताळली”, असं तो म्हणाला. परविनला पुढील दहा दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुंबईतील हिल रोड परिसरात पहाटे 5 वाजताच्या सुमारास परविनचा अपघात झाला होता. खार ऑफिसमधून तो घरी जात होता. समोरून येणाऱ्या गाडीच्या लाइट्सचा प्रकाश खूप जास्त असल्याने परविनला डिव्हाइडर दिसला नाही. त्यामुळे परविनच्या गाडीची धडक डिव्हाइडरला धडकली आणि अपघात झाला. त्यानंतर काही स्थानिकांनी त्याला गाडीमधून बाहेर काढलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. गाडीचा वेग जास्त नसतानाही हाय बीम लाइट्समुळे अपघात झाल्याचं त्याने स्पष्ट केलं.
या अपघाताविषयी प्रिती म्हणाली, “आम्हा सर्वांसाठी हा खूप धक्का आहे. त्यातून भावनिकदृष्ट्या सावरण्याचा आम्ही अजूनही प्रयत्न करतोय. तो खूप बोलका आहे आणि तो त्याच्या कामाविषयी न बोलता एक मिनिटंही राहू शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला बेडवर शांतपणे पडून राहिलेलं बघणंच खूप त्रासदायक आहे. माझ्या कुटुंबासाठी हा काळ खूप कठीण आहे.”