मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोना सिंहने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘थ्री इडियट्स’, ‘लाल सिंग चड्ढा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोना विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. भारतीय संस्कृती आणि समाजात पतीला परमेश्वर आणि देव मानण्याची परंपरा ठीक नाही, असं तिने म्हटलंय. तिच्या याच वक्तव्याची चर्चा होत आहे.
या मुलाखतीत मोना म्हणाली, “मी जेव्हा ‘क्या हुआँ तेरा वादा’ या मालिकेत काम करत होती, तेव्हा बऱ्याच महिलांना माझ्या भूमिकेतून प्रेरणा मिळाली. मला बऱ्याच लोकांचे तेव्हा मेसेज यायचे. जेव्हा एखादी महिला खचून पुन्हा उभी राहते, तेव्हा ती अधिक स्ट्राँग होते. इतक्या वर्षांपासून महिलांना दबावाखाली ठेवलंय. त्यांना प्रत्येक गोष्टीत रोखलं जातं. हे करू नका, ते करू नका. पतीला देवासमान समजा. मात्र आता हा ट्रेंड संपला आहे. आता सात जन्मांसाठी एकच पती आणि पतीला देवाचा दर्जा देण्याची वेळ संपली आहे. या बदलाने मी खूप खुश आहे. आता महिलांसोबत काहीही चुकीचं घडलं तर ती स्वत: त्याविरोधात उभी राहू शकते आणि लढू शकते.”
मोना सिंहने इन्वेस्टमेंट बँकर श्याम राजगोपालनशी 27 डिसेंबर रोजी लग्न केलं. हिंदू विवाहपद्धतीनुसार दोघं लग्नबंधनात अडकले. मोना नुकतीच ‘कफस’ या सीरिजमध्ये झळकली होती. यामध्ये तिने एका आईची भूमिका साकारली होती. याआधी मोनाने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात अभिनेता आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात मोना आमिर खानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 40 वर्षीय मोनाने 50 वर्षीय आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.