तुम्ही मनी हाईस्टचा पाचवा सिजन बघायलाच हवा. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता आपल्याकडे तो
नेटफ्लिक्सवर रिलिज झाला. मनी हाईस्टच्या चाहत्यांनी ऑफिसच्या कामाचा दिवस असतानाही सुट्टी
टाकून मनी हाईस्टचा पाचवा सिजन बघणं पसंत केलं. काही कंपन्यांनी तर आज त्यासाठी खास अशी
सुट्टी जाहीर केली होती. पाचव्या सिजनच्या पहिल्या व्हॉल्यूममध्ये पाचच एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड
हा कमीत कमी चाळीस मिनिटांचा आहे. त्यामुळे तुम्ही सलग बघितलं तर पाच एक तास तुमचे जाऊ
शकतात. पण हे पाच तास तुम्हाला अक्षरश: तुमच्या रोजच्या जगण्यातून तुमची सुटका करतात. तुम्ही
मनी हाईस्टच्या प्रोफेसरच्या गँगचे भाग होता. कारण हे पाचही एपिसोड फुल्ल ड्रामा, इमोशन आणि
क्लायमॅक्सनं भरलेले आहेत.
काय आहे पाचव्या सिजनमध्ये?
पाचवा सिजन हा शेवटाची सुरुवात आहे. हा शेवट प्रोफेसरच्या गँगसाठी आहे की त्यांच्या विरोधकांसाठी
याचीच उत्सुकता पाचव्या सिजनमध्ये आहे. चौथ्या सिजनच्या शेवटी अलेसिया सिअरा प्रोफेसरला
शोधून पकडण्यात यशस्वी होते. त्यामुळे बँकेत दरोडा टाकत असलेली गँगला आता स्वत:चं डोकं
वापरावं लागणार. त्यासाठी प्रती प्रोफेसर असलेली रकेल आता गँगसोबत आहे. तुम्ही मनी हाईस्टचे
सर्व सिजन जरी पहात आला असाल तरीसुद्धा नेमकं काय सुरु आहे हे कळण्यासाठी तुमचे पंधरा
वीस मिनिटं जातातच. हवा तर पहिला एपिसोड जातो म्हटलं तरी हरकत नाही. कारण एपिसोडला
तेवढा स्पीड आहे. तुम्हाला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. रिकॅप असला तरी एवढ्या धकाधकीच्या
आयुष्यात काय काय लक्षात ठेवणार? त्यामुळे पाचव्या सिजनचा पहिला व्हॉल्यूम पाहिलेल्या पहिल्या
चार सिजनशी कनेक्ट करता करताच संपून जातात.
काय आहे खास?
पाचव्या सिजनचे पाचही एपिसोड हे लेडीज स्पेशल आहेत. म्हणूनच ते कदाचित जास्त इंटरेस्टिंग
झालेत. प्रोफेसर हा ब्रेन आहे. पण तो ब्रेनच अलिसिया सियारा ह्या अतिशय निर्दयी लेडी पोलीस
ऑफिसरनं चेकमेट करुन टाकलाय. त्यामुळे टोकियो, लिस्बन, मनिला सगळ्या लेडीज आता
हातात बाँब गोळे घेऊन फ्रंडला लढतायत. आणि त्यांच्यासमोर आहे ती आर्मी. मनी हाईस्टच्या
आतापर्यंतच्या चारही सिजनमध्ये प्रोफेसरची दरोडेखोर गँग विरुद्ध स्पेन पोलीस असा सामना
आपण पाहिलाय. पण पहिल्यांदाच पाचव्या सिजनमध्ये आपण प्रोफेसरची गँग विरुद्ध आर्मी
युनिट असा सामना पहातोय आणि खरं सांगायचं तर हा सामना कमालीचा भारी झालाय. पाचच
एपिसोड आहेत पण त्या पाचमध्येही आर्मीच्या एन्ट्रीनं कथानकाची उत्सुकता आणखी ताणली
गेलीय. विरोधक किंवा शत्रू जेवढा मजबूत, तगडा तेवढाच हिरो, कथानक आपोआप गुढ, अनाकलनीय
होतं यात शंका नाही. पाचव्या सिजनमध्ये लष्कराच्या एन्ट्रीनं कथानक आणखी उंचीवर पोहोचलय.
कहानीत त्यांच्यामुळे ट्विस्ट निर्माण झालेत.
टोकियोची कमाल
पाचवा सिजन हा दोघींचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक अलिसिया सियरा आणि
दुसरी टोकियो. पहिल्याच एपिसोडमध्ये अलिसिया प्रोफेसरला चेनमध्ये बांधून बँकेतल्या गँगमध्ये
खळबळ माजवते. त्यामुळे कथानकातली पात्रं आपोआपच सैरभैर होतात. त्यात मग त्यांचे इगो,
त्यांचे संस्कार, हेवेदावे सगळं बाहेर पडतं. त्यातून कथानक तुम्हाला पुन्हा एकदा एका टोकावरून
दुसऱ्या टोकाला फेकत रहातं. ह्या एपिसोडमध्ये टोकियोचा फ्लॅशबॅक आहे. ती कुठून आली, तिचा
बॉयफ्रेंड, त्याचं जापनीज स्वप्न, प्रोफेसरसोबतची पहिली ओळख, तिचं पहिलं प्रेम, नंतरचे नातेसंबंध
असं सगळं आहे. ज्याप्रमाणात टोकियोचे फ्लॅशबॅक पहायला मिळतो, त्यावरुन कथानक काहीसं
प्रेडीक्टेबल होतं. पण सर्वच उकल होण्याआधीच ते टोक गाठून संपतं हेही तेवढच खरं. त्यामुळे
कुठेही रेंगाळत नाही. तुम्हाला कंटाळवाणं वाटण्यासाठी एकही एपिसोड संधी देत नाही.
आता डिसेंबरची वाट बघा
मनी हाईस्ट ही वेब सीरिज 2017 मध्ये सुरु झाली. सुरुवातीला ती फक्त दोनचं सिजनची होती पण
नेटफ्लिक्सनं तिचे अधिकार विकत घेतले आणि जगासमोर एक दमदार वेबसिरीज आली. 2020मध्ये
चौथा सिजन आलेला होता. त्यानंतर आता पाचवा सिजनचा पहिला व्हॉल्यूम. यात फक्त 5 एपिसोड
आहेत. पुढचा व्हॉल्यूम हा डिसेंबरमध्ये येईल. त्यामुळेच हा मनी हाईस्टचा फायनल सिजन आहे
आणि त्याचा शेवट तेवढाच मोठा, अफलातून आणि दिर्घकाळ लक्षात राहील याची खबरदारी घेतली
जातेय. पाचव्या सिजनच्या पाच एपिसोडमध्ये तरी ते स्पष्टपणे दिसतं आहे. त्यामुळे ज्या टोकावर
आणून टोकिओ आपल्याला उभी करते तिथून डिसेंबरमध्ये येणाऱ्या पुढच्या भागांबद्दल तेवढीच
प्रचंड उत्सुकता लागून राहते.
विकेंडसाठी बेस्ट प्लॅन
तुम्ही जर मनी हाईस्टचा एकही एपिसोड पाहिलेला नसेल तर ही बेस्ट वेळ आहे ती पहाण्याची.
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस उत्सुकता, भीती, श्वास रोखून धरणारे प्रसंग असं मनोरंजनाचं
परिपूर्ण पॅकेजमध्ये मनी हाईस्ट. ते सलग बघितले तर शनिवार, रविवार आणि कदाचित सोमवारही
तुमचा सत्कारणी लागू शकतो. त्यामुळे विकेंडला पावसा पाण्यात बाहेर पडण्याऐवजी तुम्ही मित्र मंडळींना
एकत्र करुन मनी हाईस्ट पहाण्याचा प्लॅन करु शकता आणि तो सत्कारणी लागू शकतो. कारण
मनी हाईस्टमध्ये ते सगळं मटेरियल आहे ज्याच्या तुम्ही शोधात आहात.
JEE Main Result 2021 : जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल