मुंबई : टेलिव्हिजन अभिनेता शीझान खान तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. शीझानवर त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप होता. बरेच दिवस तुरुंगात घालवल्यानंतर गेल्या महिन्यात त्याची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर कुटुंबीयांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. शीझानने आता इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये प्रेमाबद्दल कविता लिहिली आहे.
‘इश्क में मरना अच्छा नहीं लगता है, इश्क में जीना है तो बात करो. जमाने से डरना, दूर जाना, टूट जाना इश्क में, हिम्मत हारना अच्छा नहीं लगता. हिम्मत बनना है तो बात करो. हाथ थामो एक बार, नजर मिलाओ तो हमसे, यूंह रुख फेर लेना अच्छा नहीं लगता, नाराजगी मिटानी है तो बात करो’, अशी कविता त्याने लिहिली आहे. शीझान आणि तुनिषा हे ‘अली बाबा : दास्तान ए काबुल’ या मालिकेत एकत्र काम करायचे. याच मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र तुनिषाच्या आत्महत्येपूर्वी 15 दिवस आधीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं.
आता शीझानने प्रेमाविषयी ही कविता पोस्ट केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट्समध्ये अनेकांनी त्याला मालिकेत परतण्याचीही विनंती केली आहे. तुनिषाच्या मृत्यूनंतर शीझानला अटक झाली होती. त्यानंतर मालिकेत त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेण्यात आलं होतं.
तुनिशा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी वसईतील तिच्या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शिझानसोबत असलेलं प्रेमसंबंध तुटल्याने ती नैराश्यात होती. तिच्या आत्महत्येला शिझान हाच जबाबदार असल्याचा आरोप तुनिशाच्या आईने केला होता. त्यानंतर पोलिसांनी शिझान खानला अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत शिझानला तुनिशाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “मला तिची आठवण येतेय. जर ती आज जिवंत असती तर माझ्यासाठी ती लढली असती.” तुनिशाच्या आत्महत्येच्या पंधरा दिवस आधी तिचं शिझानसोबत ब्रेकअप झालं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने शिझानच्या जामिनाचा निर्णय वसई सत्र न्यायालयाकडे सोपवला होता. या खटल्यासाठी तुनिशाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ताची नियुक्ती करण्यात आली होती.