नॅशनल क्रश, एक्स्प्रेशन क्वीन अशा विविध नावांनी ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) 2016 मध्ये ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. गेल्या 6 वर्षांत रश्मिकाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने साऊथपासून बॉलिवूडपर्यंतच्या चाहत्यांना वेड लावलं. तिने ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa) या चित्रपटातील ‘सामी सामी’ या गाण्याने सर्वांची मनं जिंकली आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) या बॉलिवूड चित्रपटातून रश्मिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की रश्मिकाला अभिनेत्री व्हायचं नव्हतं.
रश्मिकाने ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं. तिने नुकतेच ब्युटी आणि पर्सनल केअर ब्रँडमध्ये पैसे गुंतवले आहेत. म्हणजेच आता ती अभिनेत्रीसोबत बिझनेसवुमनसुद्धा झाली आहे. रश्मिकाने सांगितलं की, तिला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. तिला वडिलांसोबत त्यांचा व्यवसाय सांभाळायचा होता. रश्मिकाने सांगितलं की, तिच्याकडे इतका आत्मविश्वास नव्हता की ती लोकांसमोर बोलू शकेल. त्यामुळेच तिने शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याचा विचार केला होता.
इच्छा नसली तरी रश्मिकाच्या नशिबात अभिनेत्री होणंच लिहिलं होतं. तिने आधी मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आणि तिथूनच तिच्यासाठी अभिनयविश्वाचा मार्ग खुला झाला. रश्मिकाने सांगितलं की, जेव्हा तिने पहिला चित्रपट साइन केला होता, तेव्हा तिने घरातील कोणालाही याबद्दल सांगितलं नव्हतं. पण पहिल्याच चित्रपटासाठी दीड लाखांचा धनादेश मिळाल्यावर काय करावं तेच तिला समजत नव्हतं. तिने घरी जाऊन तो चेक तिच्या आईला दिला. तेव्हा त्यावरील दीड लाखांची किंमत पाहून आई घाबरली होती. तेव्हा रश्मिकाने तिच्या आईला सांगितलं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे. रश्मिकाने सांगितलं की तिच्या वडिलांना अभिनेता बनायचं होतं. त्यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड आहे. त्यामुळे जेव्हा त्यांना समजलं की मुलीला अभिनयक्षेत्रात करिअर करायचं आहे, तेव्हा ते खूप आनंदी झाले.
व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचं झालं तर, रश्मिका ‘मिशन मजनू’ व्यतिरिक्त ‘गुड बाय’ आणि ‘अॅनिमल’सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘मिशन मजनू’मध्ये रश्मिकासोबत सिद्धार्थ मल्होत्रा तर ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूर भूमिका साकारणार आहे. या चित्रपटांशिवाय रश्मिका ‘पुष्पा: द रुल’सह इतर दोन साऊथ चित्रपटांमध्येही दिसणार आहे.