सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनीही जंगी पार्टी केली. अशाच एका पार्टीनंतरचा अभिनेत्री मौनी रॉयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पती सूरज आणि खास मैत्रीण दिशा पटानीसोबत मौनी मुंबईतल्या एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेली होती. या पार्टीनंतर क्लबबाहेर येताना पापाराझींनी तिच्यासमोर घोळका केला. अशातच गाडीकडे चालत जाणारी मौनी पायऱ्यावर धडपडते. मद्यपानामुळे तिचा तोल गेल्याचं या व्हिडीओत स्पष्ट पहायला मिळतंय. त्यावरूनच काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मौनी रॉय, तिचा पती सूरज आणि अभिनेत्री दिशा पटानी हे तिघं कारच्या दिशेने चालत असताना त्यांच्याभोवती पापाराझींचा घोळका झाल्याचं पहायला मिळतंय. पापाराझींमधून वाट काढत ते कारकडे जाण्याचा प्रयत्न करत असतानाच मौनी धडपडते. त्यानंतर तिचा पती सूरज आणि दिशा तिला सांभाळतात. अखेर सूरज तिला पकडून कारच्या दिशेने घेऊन जातो. त्यानंतर दिशा त्यांच्यापाठोपाठ कारमध्ये जाऊन बसते. यावेळी दिशासुद्धा तिची मान खाली घालून चेहरा न दाखवता चालू लागते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात मर्यादेपेक्षा जास्त ढवळाढवळ करू नका, असं म्हणत काहींनी पापाराझींना सुनावलंय. मौनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाका, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर काहींनी मौनीवर टीका केली आहे. ‘झेपत नाही तर इतकी प्यायची तरी कशाला’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘थर्टी फर्स्ट जरा जास्तच जोरात साजरी केली वाटतं’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील ही घटना आहे.
मौनी आणि दिशा पटानी यांना अनेकदा एकत्र पाहिलं जातं. या दोघी एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. थर्टी फर्स्टसुद्धा दोघींनी एकमेकींसोबत साजरा केला. मौनीने 2022 मध्ये सूरज नांबियारशी लग्न केलं. सूरज हा प्रसिद्ध बँकर आहे. तसंच त्याचा बिझनेससुद्धा आहे. 2019 मध्ये सूरज आणि मौनी यांची दुबईत एका पार्टीदरम्यान भेट झाली होती. या भेटीदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं.