मुंबई : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सुरुवातीपासून चर्चेत आहे. एकवेळ सीमा हैदरवर हेरगिरीचा आरोप झाला. आता ती तिच्यावर बनणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यूपीचे अमित जानी सीमा हैदरवर ‘कराची टू नोएडा’ चित्रपट बनवत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धमकी दिलीय. “पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत?”
“हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!” असा इशारा मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
‘रोखून दाखवा’
आता अमित जानी यांनी मनसेवर पलटवार केलाय. त्यांनी मनसेच्या धमकीला उत्तर दिलय. “चित्रपट निर्मात्यांना धमकावणं, त्यांच्याकडून वसुली करणं हे मनसेच काम आहे. मी मनसेच्या हल्ल्याच्या धमकीला अजिबात घाबरत नाही. अमित जानी 19 तारखेला मुंबईत येणार. तुम्ही अमित जानीला रोखू शकत नाही” असं प्रत्युत्तर ‘कराची टू नोएडा’ चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी दिलाय.
पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 12, 2023
‘म्हणून राज ठाकरेंची पार्टी चिडलीय’
अमित जानी उत्तर प्रदेशच्या मेरठचे निवासी आहेत. “उत्तर प्रदेश-बिहारचे प्रोड्युसर, अभिनेते आणि प्रोडक्शन हाऊस चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यामुळे राज ठाकरेची पार्टी चिडली आहे. मुंबईला बसलेल्या लोकांच्या हाताला हा चित्रपट लागला नाही. म्हणून ते नाराज आहेत” असं अमित जानी म्हणाले.
‘मुंबईतच काम करणार’
“मनसेमुळे आम्ही एका मराठी खासदाराला अनेक तास बंधक बनवून ठेवलं होतं. आम्ही यूपीतील शिवसेनेच्या कार्यालयात तोडफोड केली होती” असं अमित जानी म्हणाले. “आम्ही या चित्रपटावर मुंबईतच काम करणार आणि कोणाच्या धमकीला घाबरणार नाही” असं पलटवार अमित जानी यांनी केला.