मुंबई : चित्रपट ‘200 हल्ला हो’ (200 Halla Ho) ही एक अशी कथा आहे, जी कदाचित तुम्हाला रडवेल किंवा तुमचे डोळे तरी पाणावतील… हा चित्रपट पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवतो. असा समाजा जिथे आजही म्हणजे 21व्या शतकातही, जात आणि धर्माच्या बाबतीत एकमेकांविरुद्ध एक मोठा गट कार्यरत आहे. विशेषतः दलित लोकांसोबत होणारा भेदभाव. ही कथा दलित समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करते.
सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर बऱ्याच काळानंतर पडद्यावर परतले आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू, सलोनी बत्रा, इंद्रनील सेन गुप्ता आणि फ्लोरा सेनी सारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेने प्रेरित आहे, जो समाजाच्या चेहऱ्यावर जोरदार चपराक लगावतो.
या चित्रपटाची कथा काही सामान्य घरांपासून सुरू होते. मग, काही स्त्रिया कोर्टाबाहेर तोंड झाकून धावताना दिसतात. एसीपी अभय (इंद्रनील सेनगुप्ता) त्यावेळी कोर्टात दाखल होतो. कोर्टरूममध्ये अभय रक्ताने माखलेल्या एका माणसाला भेटतो, ज्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याच्या अंगावर इतके वार झाले आहेत की जणू कोणीतरी कित्येक वर्षांपासून बदला घेण्याच्या शोधात बसले होते आणि संधी मिळताच त्याने आपले काम फत्ते केले आहे.
या महिला कोण होत्या, या प्रश्नाचे उत्तर निरीक्षक पाटील नागपूरच्या राही बस्तीला पोहोचतात तेव्हा उघड होते. सर्व महिलांना येथे बोलवल्यानंतर पोलीस फक्त पाच महिलांना सोबत घेऊन जातात. आता आशाची (रिंकू राजगुरू) एन्ट्री होते. तथापि, प्रत्येकजण तिला पोलिसांसमोर न जाण्याची सूचना देतो, जेणेकरून तिला महिलांना तुरुंगातून बाहेर काढण्याची कल्पना शोधता येईल. चित्रपटात जे काही घडते त्यामध्ये आशा मोठी भूमिका बजावते. आता महिला तुरुंगात गेल्या आहेत, पण हत्या कोणी केली? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. बल्ली चौधरी (साहिल खट्टर) याची हत्या झाली. तोच बल्ली चौधरी जो उच्च जातीचा आहे आणि राजकारण्यांच्या घरातील आहे. बल्ली चौधरी हा या दलित बस्तीचा गुंड आहे.
या हत्येचे गूढ उकलण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या पौर्णिमा (प्लोरा सैनी) यांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये चार सदस्य आहेत. सेवानिवृत्त न्यायाधीश विठ्ठल (अमोल पालेकर) यांना समितीचे प्रमुख म्हणून बोलावण्यात आले आहे, जे स्वतः दलित समाजातून असतात. मात्र, या हत्येच्या तपासादरम्यान ते आपली जात अडथळा येऊ देत नाही. जेव्हा खटला सुरू होतो, तेव्हा कनिष्ठ न्यायालयाने अटक केलेल्या पाच महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. पण न्यायमूर्ती विठ्ठलाच्या मनात एक गोष्ट सतत येत राहते की, या महिलांनी बल्ली चौधरींना का मारले?
सुधा ताई, या त्या महिलांपैकी एक आहेत ज्या सध्या शिक्षा भोगत आहेत. त्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्यांच्याकडून सत्य जाणून घेतल्यावर न्यायमूर्ती विठ्ठल यांच्या पायाखालची जमीन सरकते. यानंतर, ते या महिलांवरील खटला वरच्या न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतात. न्यायमूर्ती विठ्ठल हे प्रकरण जिंकतात की नाही? आणि या महिलांनी बल्ली चौधरींना का मारले, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. समाजातीत वास्तव जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा जरूर पहावा.
चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती त्याच्या पात्राला न्याय देताना दिसतो. मग तो चहाच्या टपरीवर उपस्थित चहावाला असो किंवा महिलांविरुद्ध साक्ष देणारी व्यक्ती असो. प्रत्येकाने उत्तम अभिनय केला आहे. अमोल पालेकरांनी अनेक वर्षानंतर पुनरागमन केले आहे. अमोल पालेकर यांचे संवाद चित्रपट अधिक मनोरंजक बनवतात. दुसरीकडे, रिंकू राजगुरूने तिचे पात्र इतके सशक्तपणे साकारले आहे की, जणू काही चित्रपटात नव्हे तर वास्तवात ही घटना घडत आहे. या व्यतिरिक्त, वरुण सोबती वकिलाच्या भूमिकेत चपखल बसला आहे. बल्ली चौधरीची भूमिका साकारणाऱ्या साहिल खट्टरने उत्तम अभिनय केला आहे.
एकूण चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट त्याच्या कथेला न्याय देण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट खऱ्या घटनांनी प्रेरित आहे, ज्यामुळे तो पाहतानाही खरा वाटतो. चित्रपट तसा मोठा आहे, पण तो तुम्हाला जागी खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटात फक्त एकच गाणे आहे. चित्रपटात जातीवादाचा मुद्दा खूप छान मांडला आहे. दलित स्त्रिया वर्षानुवर्षे अन्याय का सहन करतात, ते सुद्धा खूप भेदक पद्धतीने मांडले आहे. त्याचबरोबर कायद्याचा खरा चेहरा दाखवला आहे. कायदा सर्वांसाठी एक आहे असे म्हटले जाते, मात्र हे केवळ उच्चवर्णीयांसाठीच असल्याचे दाखवले गेले आहे.