Darlings Movie Review: वेदना, प्रेम अन् तडजोडीची कथा; जाणून घ्या कसा आहे आलियाचा ‘डार्लिंग्स’ चित्रपट?

| Updated on: Aug 05, 2022 | 3:55 PM

या चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे आलियानेच डार्लिंग्स या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Darlings Movie Review: वेदना, प्रेम अन् तडजोडीची कथा; जाणून घ्या कसा आहे आलियाचा डार्लिंग्स चित्रपट?
Darlings
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘डार्लिंग्स’ (Darlings) हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे आलियानेच डार्लिंग्स या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीजसोबत मिळून तिने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. सुरुवातीला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. मात्र काही कारणास्तव निर्मात्यांनी ओटीटी रिलीजचा पर्याय निवडला. जाणून घेऊयात या चित्रपटाचा रिव्ह्यू..

डार्लिंग्समध्ये महिलांच्या छळाची कहाणी

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, भारतीय समाजातील महिलांवरील अत्याचाराचं चित्रण यात केलं आहे. चित्रपटाची कथा मुंबई परिसरात घडते. यामध्ये एक जुना मुस्लिमबहुल भाग दाखवण्यात आला आहे, जिथे प्रियकर आणि प्रेयसी लग्न करतात. प्रियकराला लग्नाआधी रेल्वेच्या तिकिट विभागात नोकरी लागते. लग्नानंतर मात्र तो पत्नीचा छळ करू लागतो, तिला त्रास देतो आणि त्याची पत्नी हे सर्व मूकपणे सहन करते. या कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा मुलगी तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवते. ती कोणत्याही कायद्याचा आधार घेत नाही. तर स्वतःहून सूड घेते. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीची यात एण्ट्री होते आणि मुलीच्या आईचा भूतकाळही सर्वांसमोर येतो.

कलाकारांचं अभिनय

आलिया भट्ट, शेफाली शाह यांच्यासह संपूर्ण स्टारकास्टने चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे. आलियाने बद्रुनिस्सा ही व्यक्तीरेखा अगदी चोख साकारली आहे. आलिया म्हणजे दमदार अभिनय हे जणू आता समीकरण बनलं आहे. राजेश वर्मानेही उत्तम काम केलं आहे. चित्रपटात शेफाली शाहने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. दिल्ली क्राइम आणि जलसा नंतर ती पुन्हा एकदा स्वत:चं दमदार अभिनयकौशल्य सिद्ध करण्यात यशस्वी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपट पाहावा की नाही?

या चित्रपटाचं दिग्दर्शन जसमीत के रीन यांनी केलं आहे. त्यातील सर्वच पात्रांनी आपापली भूमिका चोख साकारली आहे. पण चित्रपटाचं दिग्दर्शन आणि पटकथा हे थोडेसे कमकुवत ठरतात. चित्रपटाच्या संगीताबद्दल सांगायचं झालं तर गुलजार, विशाल भारद्वाज आणि मेलो डी यांनी मिळून संगीत दिलं आहे. मात्र संगीत प्रेक्षकांवर फारसा प्रभाव टाकत नाही. जवळपास अडीच तासांचा हा चित्रपट थोडाफार कंटाळवाणा वाटू शकतो. पण तुम्ही जर आलियाचे चाहते असाल, तर तिच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहू शकता.

स्टारकास्ट : आलिया भट्ट, शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मैथ्यू, राजेश शर्मा
दिग्दर्शक : जसमीत के रीन
निर्माते : इंटरनल सनशाइन प्रॉडक्शन्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट
कुठे पाहू शकता? : नेटफ्लिक्स
रेटिंग्स : 3/5