अनंत-राधिकाची पहिली भेट घडवणाऱ्या या स्टारकिडला अंबानींकडून 30 कोटींचा बंगला? काय आहे सत्य?

| Updated on: Jul 16, 2024 | 9:39 AM

मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानीने मोठे व्यावसायिक वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंटशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याची चर्चा केवळ देशभरातच नाही तर परदेशातही झाली. अनंत आणि राधिकाच्या लग्नाबाबत एका अभिनेत्याने दावा केला आहे.

अनंत-राधिकाची पहिली भेट घडवणाऱ्या या स्टारकिडला अंबानींकडून 30 कोटींचा बंगला? काय आहे सत्य?
Anant Ambani and Radhika Merchant (1)
Image Credit source: Instagram
Follow us on

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा ‘वेडिंग ऑफ द इअर’ म्हणून ओळखला जातोय. यामागचं कारण जगजाहीर आहे. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नसोहळ्याचा जल्लोष सुरू होता. अखेर शुक्रवारी 12 जुलै रोजी या दोघांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) इथल्या जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात आता अशीही चर्चा होऊ लागली आहे की, अनंत आणि राधिका यांची पहिली भेट घडवून आणणाऱ्या एका स्टारकिडला अंबानींकडून तब्बल 30 कोटी रुपयांचा बंगला भेट म्हणून देण्यात आला आहे. एका अभिनेत्याने हा दावा केला आहे.

आपल्या वादग्रस्त ट्विट्समुळे सतत चर्चेत असणारा अभिनेता कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने नुकतंच एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्याने दावा केलाय की अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी याने अनंत आणि राधिका यांची पहिली भेट घडवून आणली होती. यासाठी त्याला अंबानींकडून तगडी भेट मिळाली आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान हा मुंबईतील वांद्रे इथं राहतो. कारण मुकेश अंबानी यांनी त्याला 30 कोटी रुपयांचा आलिशान अपार्टमेंट भेट म्हणून दिली आहे. खरंतर मिजानने राधिकाची अनंतशी ओळख करून दिली होती. काहीही होऊ शकतं.’

हे सुद्धा वाचा

केआरकेनं केलेल्या या दाव्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यावर आता मिजानच्या वडिलांनी म्हणजेच जावेद जाफरीने प्रतिक्रिया दिली आहे. जावेदने केआरकेच्या पोस्टवर हसण्याचे इमोजी शेअर करत लिहिलं, ‘काहीही!’ या ट्विटनंतर नेटकरी केआरकेची खिल्ली उडवू लागले. ‘तू अजून पण फॉरवर्ड मेसेजवर विश्वास ठेवतोस का’, असा सवाल नेटकऱ्यांनी त्याला केला.

मिजान जाफरी हा अनंत अंबानीचा चांगला मित्र आहे. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमात तो आवर्जून सहभागी झाला होता. मिजानने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सहाय्यक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्याने ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटांसाठी भन्साळींसोबत काम केलंय. 2019 मध्ये त्याने भन्साळींच्याच प्रॉडक्शनअंतर्गत बनलेल्या ‘मलाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये भन्साळींची भाची शार्मिन सेहगलने मिजानसोबत मुख्य भूमिका साकारली होती.