‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना हे सतत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या संगोपनावरून कमेंट केली होती. त्यानंतर या दोघांमधील वाद चर्चेत आला होता. सोनाक्षीनेही मुकेश खन्ना यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. तिला रामायणाचं ज्ञान माहित नसल्यावरून मुकेश यांनी विविध मुलाखतींमध्ये सतत टोमणे मारले होते. त्यानंतर आता त्यांनी अभिनेता रणबीर कपूरवर निशाणा साधला आहे. रणबीर त्याच्या आगामी चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारतोय. रामायणावर आधारित चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्यावरून आता मुकेश खन्ना यांनी रणबीरवर निशाणा साधला आहे.
‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना याबद्दल म्हणाले, “अरुण गोविल यांनी प्रभू श्रीराम यांची भूमिका ज्याप्रकारे साकारली आहे, ते आता सुवर्ण स्टँडर्ड बनलं आहे. मी इतकंच म्हणू शकतो की जो कोणी रामाची भूमिका साकारेल, त्याने रामाचे गुण आपल्यात अंगिकारले पाहिजेत. तो रावणासारखा दिसू नये. जर खऱ्या आयुष्यात तो लंपट -छिछोरा असेल तर स्क्रीनवर ते दिसून येईल. जर तुम्ही रामाची भूमिका साकारत असाल तर तुम्हाला पार्ट्या करण्याची किंवा दारू पिण्याची परवागनी नसली पाहिजे. पण राम कोण साकारणार हे ठरवणारा मी कोण आहे?”
या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. 2023 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. अनेकांनी त्यातील भूमिका, त्यांचे लूक आणि डायलॉग्सवर टीका केली होती. या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका साऊथ सुपरस्टार प्रभासने साकारली होती. इतका मोठा सुपरस्टार असूनही प्रभासला रामाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी स्विकारलं नाही, कारण तो रामासारखा दिसतच नव्हता, असं ते म्हणाले. त्यानंतर रणबीरविषयी ते पुढे म्हणाले, “तो खूप चांगला अभिनेता आहे. पण मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहीन आणि तो रामासारखा दिसला पाहिजे. त्याने आताच अॅनिमल या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याचं नकारात्मक व्यक्तीमत्त्व अधोरेखित करण्यात आलं होतं. त्या भूमिकेचा यावर कोणता परिणाम होऊ नये, इतकंच मला वाटतं.”