मुंबई: सध्या कलाविश्वात अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येचीच चर्चा आहे. 21 वर्षीय तुनिशाने टोकाचं पाऊल उचलत सर्वांनाच मोठा धक्का दिला. एकीकडे या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त होत असतानाच ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्याला ‘बालिश’ असं म्हटलंय. मुकेश यांनी त्यांच्या व्लॉगच्या माध्यमातून या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत हे प्रकरण लव्ह-जिहादचं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
“हे काही लव्ह-जिहादचं प्रकरण नाही. प्रत्येक खान तशा प्रकारचं काम करत असेल हे काही गरजेचं नाही. ही अत्यंत बालिश घटना आहे. तुनिशाने या जगाचा निरोप घेतला आहे. मात्र तिच्या एक्स-बॉयफ्रेंडवर निशाणा साधला जातोय. मात्र या घटनेच्या मुळाशी नेमकं काय आहे, हे कोणालाच जाणून घ्यायचं नाहीये”, असं ते म्हणाले.
“तुनिशाच्या आत्महत्येनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पण याला जबाबदार मुलीचे आई-वडील आहेत. मुलं स्वत:ला सांभाळून घेतात, पण मुली भावनिकदृष्ट्या गुंतलेल्या असतात. जेव्हा तो धागा तुटतो, तेव्हा त्या आयुष्य संपवतात. जी मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला देव मानत असेल आणि तिला जेव्हा समजतं की तो तिची फसवणूक करतोय, तेव्हा तिला किती वाईट वाटत असेल याचा विचार करा. तुनिशासोबत हेच घडलं आणि तिने स्वत:चं आयुष्य संपवलं. पालकांनी त्यांच्या मुलांना एकटं सोडायला नाही पाहिजे”, असं म्हणत मुकेश खन्ना यांनी तुनिशाच्या आई-वडिलांना जबाबदार ठरवलं.
आत्महत्या ही फक्त एक-दोन मिनिटांची गोष्ट असते. पण त्यावेळी सोबत मित्र-मैत्रिणी, पालक सोबत असले तर कदाचित तुनिशाचे प्राण वाचले असते, असंही ते म्हणाले. “पालकांनी त्यांच्या मुलींना मायानगरीत एकटं सोडायला नाही पाहिजे. दर महिन्याला पालकांनी मुलांची भेट घेतली पाहिजे. त्यांची विचारपूस केली पाहिजे. त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंडस्ट्रीतील माहौल आता बदलला आहे. 30-35 दिवसांपर्यंत शोची शूटिंग सुरू असते. अशा वेळी सहकलाकारासोबत जवळीक वाढते. मुली भावनिकदृष्ट्या खूप गुंतून जातात”, असं मुकेश खन्ना म्हणाले.