अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. सैफ आणि करीना कपूरचा छोटा मुलगा जहांगीरच्या दोन्ही नॅनी लीमा आणि जुनू यांनी आरोपीला ओळखलंय. बुधवारी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ओळख परेडसाठी या दोन्ही नॅनींना बोलावलं होतं. 16 जानेवारी रोजी आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद हा चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात शिरला होता. यावेळी त्याने केलेल्या चाकूहल्ल्यात सैफसोबतच जहांगीरच्या नॅनीसुद्धा जखमी झाल्या होत्या. आरोपीने आपण बांगलादेशी नागरिक असल्याचं पोलिसांच्या चौकशीत कबूल केलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आर्थर रोड तुरुंगात झालेल्या टीआयपीमध्ये एलियम्मा फिलिप आणि दुसऱ्या नॅनीने अटक केलेल्या आरोपीला ओळखलं. तहसीलदार आणि पाच स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये आरोपीसारख्या दिसणाऱ्या इतर नऊ जणांना रांगेत उभं करण्यात आलं होतं आणि नॅनी फिलिपला आरोपीची ओळख पटवण्यास सांगितलं गेलं. 16 जानेवारी रोजी जहांगीरच्या वॉशरुममध्ये आरोपीला सर्वांत आधी नॅनी फिलिपनेच पाहिलं होतं.
चाकू आणि काठीसह आरोपी सैफच्या घरात शिरला होता. नॅनी फिलिपने त्याला पाहताच त्याने तिच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. त्याचवेळी नॅनीने जहांगीरला उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिच्यावर चाकूहल्ला केला. हे पाहून दुसऱ्या नॅनीने ओरडण्यास सुरुवात केली. या आवाजाने वरच्या मजल्यावर झोपलेले सैफ अली खान आणि करीना कपूर खाली मुलाच्या खोलीत आले. आरोपीने सैफसोबतही झटापट करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याने अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले. यादरम्यान मुलांसह नॅनीने वरच्या मजल्यावर धाव घेतली आणि इतरांनी आरोपीला जहांगीरच्या खोलीत बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा बंद न झाल्याने आरोपी तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरला, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. तीन दिवसांच्या शोधानंतर पोलिसांना ठाण्यातून आरोपीला अटक केली.
फिलीप आणि दुसऱ्या नॅनीने आरोपीला ओळखल्याने हा खटला सैफच्या बाजूने आणखी मजबूत झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र आरोपीचा चेहरा आधीच सीसीटीव्हीमध्ये दिसला होता आणि त्यानंतर माध्यमांमध्येही त्याचा चेहरा दाखवण्यात आल्याने, या ओळख परेडला विशेष महत्त्व नसल्याचं वकिलांनी नमूद केलंय. तर आरोपीचा फेशिअल रेकग्निशन टेस्ट रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल फोन लोकेशन आणि आयपीडीआर (इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल्स रिपोर्ट) यांसारखे मजबूत तांत्रिक पुरावे असल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यास मदत होईल, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलंय.