घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून राहिला, ‘मुंज्या’ फेम अभिनेत्याचा संघर्ष

| Updated on: Jul 07, 2024 | 2:52 PM

अभयने करिअरच्या सुरुवातीला मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या सिझनमध्ये सहाय्यक भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये त्याचे अवघे तीन ते चार सीन्स होते, मात्र त्यातही त्याच्या अभिनयकौशल्याची स्तुती झाली. आता 'मुंज्या'मुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात जवळपास 123 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून राहिला, मुंज्या फेम अभिनेत्याचा संघर्ष
'मुंज्या' फेम अभिनेता अभय वर्मा
Follow us on

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवलं. कमी बजेटमध्ये बनला असूनही आणि कोणतीही मोठी स्टारकास्ट नसूनही या चित्रपटावर प्रेक्षक-समिक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. 30 कोटी रुपये बजेटच्या या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. इतर चित्रपटांना तगडी टक्कर देत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट टिकला आहे. यामध्ये अभय वर्मा, शर्वरी वाघ, भाग्यश्री लिमये, सुहास जोशी, अजय पूरकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभय वर्माने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ‘मुंज्या’ हा त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला आहे. इतकंच नव्हे तर अभयला ‘नॅशनल क्रश’ असंही म्हटलं जातंय. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.

25 वर्षीय अभयला ‘द फॅमिली मॅन’मुळे ओळख मिळाली. त्याने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि सीरिजमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मुंज्या’च्या निमित्ताने त्याला पहिल्यांदा मुख्य भूमिकेत ऑफर मिळाली आणि त्यात त्याने कमाल कामगिरी केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभयने त्याच्या संघर्षाबद्दल खुलासा केला. अभयने सांगितलं की त्याचे वडील दागिन्यांचं दुकान चालवायचे. तो सहावीत असताना त्याच्या वडिलांना काविळ झालं होतं आणि त्यामुळे त्यांच्या यकृतावर परिणाम झाला होता. वडिलांच्या आजारपणामुळे आईवर संपूर्ण जबाबदारी आली होती. अखेर वाढत्या खर्चांमुळे त्यांनी आपलं घर विकलं होतं. आजारपणातील तीन वर्षांनंतर अभयच्या वडिलांचं निधन झालं.

हे सुद्धा वाचा

वयाच्या 19 व्या वर्षी अभय मुंबईत करिअरसाठी आला. त्याचा मोठा भाऊ अभिषेक त्यावेळी टीव्ही क्षेत्रात काम करत होता. थोड्या संघर्षानंतर अभयला भूमिका मिळू लागल्या. 2022 मध्ये त्याला ‘सफेद’ या चित्रपटातील ट्रान्सजेंडरच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. या भूमिकेची तयारी करण्यासाठी अभय वाराणसीला गेला होता आणि तिथे ट्रान्सजेंडर म्हणून काही आठवडे राहिला होता. मात्र एके रात्री काही मुलांच्या समुहाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्राण वाचवण्यासाठी त्याला खरी ओळख सांगावी लागली होती. संदीप सिंह दिग्दर्शित ‘सफेद’ हा चित्रपट गेल्या वर्षी झी5 या ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.