‘नाळ 2’मधील चिमी कशी सापडली? अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीने जिंकली प्रेक्षकांची मनं

| Updated on: Nov 13, 2023 | 3:53 PM

नाळ 2 या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर यांच्यासोबतच भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘नाळ’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला.

नाळ 2मधील चिमी कशी सापडली? अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीने जिंकली प्रेक्षकांची मनं
'नाळ 2'मधील चिमी कशी सापडली?
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 13 नोव्हेंबर 2023 | झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मिती ‘नाळ : भाग 2’ हा चित्रपट अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर 10 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले होते. आता ‘नाळ 2’मध्ये चैत्यासोबतच आणखी एका व्यक्तिरेखेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा ठोसर. चित्रपटातील ‘डराव डराव’ हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं, तेव्हा या गाण्यातील ही चिमुकली कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. तिचा तो तोरा बघून अनेकजण तिचे चाहते झाले. एवढ्या लहानग्या, गोंडस, निरागस त्रिशाची निवड ‘चिमी’च्या व्यक्तिरेखेसाठी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक होते.

त्रिशाच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणाले, ”मी, नागराज मंजुळे आणि आमची टीम चित्रपटासाठी कलाकारांची निवड करतो. ज्यावेळी ‘चिमी’ची व्यक्तिरेखा लिहिली गेली आणि तिचा शोध सुरु झाला त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नाही. आमच्या डोक्यात एकच होते ती मुलगी जितकी लहान असेल तितकं उत्तम. त्या दृष्टीने आमचं शोधकार्य सुरु होतं. अनेक ऑडिशन्स आल्या होत्या. आमचं एक होतं की, शक्यतो नवा चेहरा असावा. कारण आधी काम केलेले बालकलाकार तसे अनुभवी असतात आणि आम्हाला नैसर्गिक अभिनय हवा होता. आमच्या टीमने तिची ऑडिशन घेतली. आम्हाला सगळ्यांनाच ती आवडली.”

हे सुद्धा वाचा

“आमच्या टीममधून काही जण दोन दिवस तिच्या घरी दिवसभर जायचे आणि तिचं ऑडिशन घ्यायचे. ती कशी वावरते, बोलते या सगळ्याचं निरीक्षण केलं आणि आम्हाला आमची ‘चिमी’ सापडली. त्यावेळी ती फक्त साडेतीन वर्षांची होती. त्रिशा अतिशय गुणी मुलगी आहे. इतकी लहान असूनही कधी तिने किरकिर केली नाही. आम्हाला कधी कधी वाटायचं की दिवसभर चित्रीकरण ही करू शकेल ना? परंतु त्रिशा नेहमीच उत्साही असायची. संवादाचे ‘गिव्ह अँड टेक’ही तिने पटकन आत्मसात केले. तिचं पाठांतर अतिशय उत्तम आहे. सेटवर त्रिशा सगळ्यांचीच लाडकी होती. आम्ही तिचा चौथा वाढदिवसही सेटवर साजरा केला होता,” असं दिग्दर्शकांनी सांगितलं.