लॉस एंजेलिस : एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या विभागात ‘RRR’मधील ‘नाटू नाटू’सोबतच ‘टेल इट लाइक अ वुमन’मधील ‘अप्लाऊज’, ‘टॉप गन : मॅवरिक’मधील ‘होल्ड माय हँड’, ‘ब्लॅक पँथर : वकांडा फॉरेव्हर’मधील ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘एवरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स’मधील ‘दिस इज अ लाइफ’ या गाण्यांना नामांकनं मिळाली होती.
याआधी नाटू नाटू गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता. भारतीय सिनेसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. ‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.
RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. यामध्ये रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.
❤️?❤️?❤️?❤️?❤️?❤️?❤️? #NaatuNaatu #RRRMovie #Oscars95 pic.twitter.com/yIDgYJlTXH
— RRR Movie (@RRRMovie) March 13, 2023
प्रेम रक्षितने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. “या गाण्याची कोरिओग्राफी करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. कारण एका स्टारसोबत काम करणं सोपं असतं. त्या सुपरस्टारची स्टाइल आणि कामाची पद्धत आपल्याला माहीत असते. मात्र दोन वेगळ्या स्टाइलच्या कलाकारांना एकाच एनर्जीमध्ये आणणं कठीण होतं”, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. नाटू नाटू या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्याने रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसाठी 110 स्टेप्स तयार केले होते.