अभिनेता नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला येत्या 4 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये हे लग्न पार पडणार आहे. ऑगस्टमध्ये नाग चैतन्य आणि सोभिताने साखरपुडा केला. त्यापूर्वी काही वर्षं दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र साखरपुडा होईपर्यंत त्यांनी कधीच रिलेशनशिपबद्दल कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. आता लग्नाच्या काही दिवस आधी नाग चैतन्य त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्यने त्याच्या आणि सोभिताच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. मुंबईत एका कामानिमित्त दोघांची पहिली भेट झाली होती.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत नाग चैतन्य म्हणाला, “मी माझ्या ओटीटी शोच्या लाँचसाठी मुंबईला आलो होतो. त्याचवेळी तिचाही त्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर शो आला होता. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी भेटलो आणि बोललो. गेल्या काही महिन्यांपासून सोभिता आणि तिच्या कुटुंबीयांबद्दल जाणून घेण्याचा अनुभव खूपच चांगला आहे. माझे आणि तिचे कुटुंबीय ज्याप्रकारे एकमेकांशी संवाद साधत आहेत, ते पाहून मला खूप आनंद होत आहे. मी या लग्नासाठी, लग्नातील प्रत्येक विधीसाठी आणि कुटुंबीयांना एकत्र जल्लोष करताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.”
“मला त्यांच्याच घरातील मुलासारखी वागणूक दिली जात आहे. या नात्यात एक वेगळाच कम्फर्ट आहे आणि सुरुवातीपासून आमच्यात बऱ्याच गोष्टींमध्ये साधर्म्य आहे. सोभिता ही कौटुंबिक मुलगी आहे आणि आम्ही सर्वांनी एकत्र काही सण-उत्सवसुद्धा साजरे केले आहेत”, असं नाग चैतन्यने सांगितलं. त्याचप्रमाणे या लग्नाच्या फुटेजचे हक्क एका ओटीटी प्लॅटफॉर्मला विकल्यात आल्याच्या चर्चांना त्याने फेटाळलंय. “हे सर्व खोटं आहे, आम्ही अशी कोणती डील केलीच नाही”, असं त्याने स्पष्ट केलं.
याआधी दिलेल्या एका मुलाखतीतही नाग चैतन्यने सोभिताबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. “सोभितासोबत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास आणि आयुष्य एकत्र साजरं करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. माझं तिच्याशी कनेक्शन खूप घट्ट आहे. ती मला खूप चांगल्याप्रकारे समजून घेते आणि ती माझ्या मनातील पोकळी भरून काढते. आमचा हा पुढचा प्रवास खूपच अप्रतिम असेल”, असं तो म्हणाला होता. याआधी नाग चैतन्यने समंथाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने घटस्फोट घेतला.