अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नाग चैतन्य (Naga Chaitanya) यांचा घटस्फोट चर्चेचा विषय ठरला होता. विभक्त झाल्यानंतरही ही जोडी अनेकदा सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता नाग चैतन्यचे वडील नागार्जुन (Nagarjuna) हे त्याविषयी व्यक्त झाले आहेत.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “तो आता खूश आहे आणि सध्या तरी मला हेच दिसतंय. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. त्याच्या आयुष्यातला तो एक अनुभव होता. दुर्दैवी अनुभव. मात्र आपण सारखा तोच विषय घेऊन बसू शकत नाही. तो काळ गेला. तो काळ आता आमच्या आयुष्यात नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातूनही तो काळ निघून जावा अशी माझी इच्छा आहे.”
या मुलाखतीत नागार्जुन यांनी रिमेक चित्रपटांबद्दलही मत व्यक्त केलं. “लोकांनी चित्रपटांचे रिमेक बनवणं थांबवलं पाहिजे. प्रत्येकजण ओटीटीवर सगळे चित्रपट पाहतोय. मी तुम्हाला सांगतो, हे थांबलं पाहिजे. प्रत्येकजण चित्रपट पाहतो, त्यामुळे तुलना होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे रिमेक बनवणं थांबलं पाहिजे. रिमेक बनवले गेले नाही पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे”, असं ते म्हणाले.
नागार्जुन यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली.