दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नाग चैतन्यने आज (8 ऑगस्ट) सकाळी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर आज हैदराबादमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. नाग चैतन्यचे वडील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर सर्वांत आधी या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. ‘सोभिताचं आमच्या कुटुंबात स्वागत करण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत’, असंही त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो तर व्हायरल होतच आहेत, पण त्याचसोबत नागार्जुन यांचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुदाचारी’ या चित्रपटाच्या ‘सक्सेस बॅश’मधील हा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओमध्ये नागार्जुन त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी बोलताना दिसत आहेत. सोभितानेही त्या चित्रपटात भूमिका साकारली होती. मंचावर नागार्जुन यांना जेव्हा सोभिताविषयी विचारलं जातं, तेव्हा ते म्हणतात “ती खूप चांगली आहे. मी हे म्हटलं नाही पाहिजे, पण ती खरंच खूप हॉट आहे. तिच्यात असं काहीतरी नक्कीच आहे, जे इतरांना आकर्षित करतं.” आता नाग चैतन्य आणि सोभिताच्या साखरपुड्यानंतर नागार्जुन यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ती वयाने लहान आहे, किमान विचार करून बोला’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे शोभतं का’, असा सवाल दुसऱ्याने केलाय.
Any day daddy choice >>>pic.twitter.com/He3CdUTipj
— T (@Ashtweetzzz) August 8, 2024
नाग चैतन्यने याआधी 2017 मध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभितासोबत जोडलं गेलं. नागार्जुन यांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत लिहिलंय, ‘नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा आज सकाळी 9.42 वाजता पार पडला. आमच्या कुटुंबात तिचं स्वागत करण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. या आनंदी जोडप्याला खूप शुभेच्छा. त्यांना आयुष्यभराचं प्रेम आणि आनंद मिळो.’ नागार्जुन यांनी या पोस्टमध्ये साखरपुड्याच्या तारखेचं महत्त्वही सांगितलं आहे. ‘8.8.8 अनंत प्रेमाची सुरुवात’, असं त्यांनी पुढे लिहिलंय. 8 तारीख, आठवा महिना आणि 2024 या वर्षाची बेरीजसुद्धा 8 येत असल्याने आजचा दिवस अत्यंत खास असल्याचं मानलं जात आहे.