मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : नागार्जुन हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि इंडस्ट्रीतील मोठे स्टार आहेत. त्यांनी केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. आज (सोमवार) त्यांची पत्नी अमाला अक्किनेनी यांचा वाढदिवस आहे. अमाला या नागार्जुन यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. एकेकाळी इंडस्ट्रीत त्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी विशेष नाव कमावलं. अमाला आज त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1967 रोजी कोलकातामध्ये झाला. पती नागार्जुन यांच्याप्रमाणेच अमाला यांनीसुद्धा केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही दमदार काम केलंय.
1986 ते 1992 दरम्यान अमाला यांनी तमिळ चित्रपटसृष्टी गाजवली. ‘उल्लादक्कम’, ‘लाइफ इज ब्युटीफूल’, ‘वेदम पुदितू’, ‘पुष्पक विमान’, ‘मैथिली इन्नई काथली’, ‘निर्णायम’, ‘शिवा’, ‘कारवां’ आणि ‘दयावान’ यांसारखे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजले. अमाला या नागार्जुन यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. अभिनेत्रीसोबतच त्या भरतनाट्यम डान्सर आणि ॲनिमल वेलफेअर ॲक्टिविस्टसुद्धा आहेत. करिअरच्या शिखरावर असताना अमाला नागार्जुन यांच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर त्यांनी लग्न करण्यासाठी इंडस्ट्री सोडली. अमाला आणि नागार्जुन यांनी 1992 मध्ये लग्न केलं.
नागार्जुन हे आधीच विवाहित होते. नाग चैतन्य हा त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा आहे. त्यामुळे अमाला ही नाग चैतन्यची सावत्र आई आहे. तर अखिल अक्किनेनी हा अमाला आणि नागार्जुन यांचा मुलगा आहे. अमाला यांनी टी राजेंद्र यांच्या ‘मैथिली इन्नई काथली’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. हा क्लासिकल चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामुळे अमाला रातोरात स्टार बनल्या. तर नागार्जुन यांच्यासोबत त्यांनी ‘शिवा’ आणि ‘निर्णयम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
तब्बल 20 वर्षांनंतर अमाला यांनी ‘लाइफ इज ब्युटीफुल’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पुनरागमन केलं. 2012 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी बरेच पुरस्कार पटकावले. चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीसोबत अमाला या त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखल्या जातात. ‘ब्ल्यू क्रॉस ऑफ हैदराबाद’ या स्वयंसेवी संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत. काही वर्षांपूर्वी अमाला आणि त्यांच्यासोबतच्या नऊ जणांना आंदोलन केल्यामुळे अटक करण्यात आली होती. जंगलातील कोळसा उत्खननाच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन केलं होतं.