मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : नागराज मंजुळे निर्मित 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले. यातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘भिंगोरी’ असं या गाण्याचं नाव असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचं संगीत त्याला लाभलं आहे. या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडुबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे. मराठी लोकगायिका कडुबाई खरात यांच्या आवाजातील हे पहिलंच चित्रपट गाणं आहे.
औरंगाबादच्या कडुबाई खरात या डॉ. आंबेडकर यांच्यावर गाणी गाण्यासाठी ओळखल्या जातात. ‘मह्या भीमानं सोन्यानं भरलिया ओटी..’ हे त्यांचं गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. कडुबाई या बाबासाहेबांवरील गाणं म्हणून मिळणाऱ्या भिक्षेवर आपलं घर चालवतात. त्यांना पहिल्यांदाच चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आहे. ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी ही संधी दिली आहे.
2018 मध्ये ‘नाळ’ या चित्रपटात विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दिसलं होतं. त्या पात्रात पाणी कमी आणि वाळवंट जास्त होतं. असं असूनही पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय दिसला होता. ही कमाल सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेराची होती. अशा रखरखीत वातावरणातही माया करणाऱ्या माणसांच्या सावलीत चैतू घडत होता. आता ‘नाळ 2’मध्ये मोठा झालेला चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आला आहे.
‘भिंगोरी’ या गाण्यातून नजरेत भरतं ते पश्चिम महाराष्ट्रात डोंगररांगांनी वेढलेल्या गावाचं निसर्गसौंदर्य आणि या गावात आलेल्या चैतूला बघून आनंदी झालेले गावकरी. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला बघतो, पण इथून पुढे त्याच्या हा प्रवास नेमका कुठवर जातो ती कहाणी चित्रपटात बघायला मिळेल. ‘जाऊ दे ना वं’ या पहिल्या भागातील लोकप्रिय गाण्यानंतर आता ‘भिंगोरी’ या गाण्यातून चैतूच्या या प्रवासाची सुरुवात बघायला मिळतेय. येत्या 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘नाळ’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.