हैदराबाद: अभिनेत्री नम्रता शिरोडकरने 1993 मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सलमान खानच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटात छोटी भूमिका साकारत तिने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती ‘वास्तव’ आणि ‘कच्चे धागे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. या चित्रपटांमुळे तिने बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र करिअरच्या शिखरावर पोहोचत असताना नम्रताने साऊथ सुपरस्टार महेश बाबूशी लग्न केलं आणि चित्रपटांना रामराम केला.
नम्रताच्या या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. करिअरच्या शिखरावर पोहोचल्यानंतर नम्रताने लग्न का केलं आणि फिल्म इंडस्ट्री का सोडली, याचं उत्तर कोणालाच माहीत नव्हतं. आता लग्नाच्या 17 वर्षांनंतर नम्रताने यामागचं खरं कारण सांगितलं.
नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट 2000 मध्ये ‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर पाच वर्षांनी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि कुटुंब सांभाळ्याकडे लक्ष केंद्रीत केलं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नम्रताने सांगितलं, “मी खूप आळशी होती. मी नेहमीच सांगते की मी कोणताच प्लॅन केला नव्हता. जे काही घडलं ते आपोआप होत गेलं. मी असं म्हणू शकते की मी जे निर्णय घेतले, ते योग्य होते आणि त्या निर्णयांमुळे मी आता खूश आहे. मी जेव्हा अभिनयाला सुरुवात केली होती, तेव्हासुद्धा खूप आळशी होते. मॉडेलिंग करून कंटाळा आल्यामुळे मी अभिनयाकडे वळले होते.”
“मॉडेलिंगनंतर मी थेट अभिनयात पाऊल ठेवलं. जेव्हा मी कामाचा आनंद घ्यायला शिकले आणि अभिनयातील करिअरकडे गांभीर्याने पाहू लागले तेव्हा माझी भेट महेशशी झाली. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. जर मी माझ्या कामाकडे गांभीर्याने पाहिलं असतं तर आता माझं आयुष्य खूप वेगळं असतं. मात्र माझी कोणतीच तक्रार नाही. महेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदी क्षणांपैकी एक होता. त्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. लग्न आणि आई होण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. कोणत्याही गोष्टीसाठी मी हे सगळं बदलू इच्छित नाही”, असं ती पुढे म्हणाली.
नम्रता आणि महेश बाबू यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नम्रता सध्या कुटुंबीयांसोबत हैदराबादमध्ये राहते. याचसोबत ती निर्माती म्हणून काम करतेय. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मेजर’ या चित्रपटाची निर्मिती तिने केली.