अभिनेते नाना पाटेकर हे नुकतेच ‘इंडियन आयडॉल’च्या पंधराव्या सिझनमध्ये पोहोचले होते. या एपिसोडमध्ये त्यांनी एका स्पर्धकाला अंकशास्त्राविषयी (न्यूमरोलॉजी) प्रश्न विचारला. सोनी टीव्हीकडून जारी करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की नाना पाटेकर हे स्पर्धक मायसमी बसू हिच्यासोबत अंकशास्त्राबद्दल बोलत आहेत. नाना तिला विचारतात, “तू अंकज्योतिषवर विश्वास ठेवतेस का?” यावर ती सकारात्मकरित्या मान हलवते. त्यावर नाना म्हणतात, “मला सांग, ही स्पर्धा कोण जिंकणार?” नानांचा हा प्रश्न ऐकून मायसमी चकीत होते आणि त्यावर ती ठोस असं काही उत्तर देऊ शकत नाही.
यानंतर नाना पाटेकर तिला म्हणतात, “आता तू माझ्या वयाचा अंदाज लाव.” हा प्रश्न ऐकल्यानंतरही मायसमी पेचात पडते आणि सूत्रसंचालक आदित्य नारायणकडे पाहू लागते. तिला योग्य उत्तर देता न आल्याने नाना पुढे म्हणतात, “हे बघ, तुझी न्यूमरोलॉजी बकवास आहे ना? तू कोणत्याही दडपणाशिवाय गाणं गा, हेच सत्य आहे. बाकी सर्वकाही सोडून दे.” नानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
‘बिचारी, नाना पाटेकरांचे प्रश्न ऐकून ती तणावाखाली आली’, असं एकाने लिहिलं. तर ‘इंडियन आयडॉल आता खूपच रंजक होऊ लागला आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. नाना पाटेकर हे ‘इंडियन आयडॉल 15’मध्ये त्यांच्या आगामी ‘वनवास’ या चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी पोहोचले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केलं आहे. चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘वनवास’ हा चित्रपट येत्या 20 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
इंडियन आयडॉल हा गाण्याचा रिअॅलिटी शो असून त्याचं पंधरावं पर्व सुरू आहे. गायिका श्रेया घोषाल, संगीतकार आणि गायक विशाल ददलानी, रॅपर आणि गायक बादशाह हे या पर्वाचे परीक्षक आहेत. तर अभिनेता आणि गायक आदित्य नारायण या शोचं सूत्रसंचालन करतोय. हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होतो.