मुंबई: विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांच्या वडिलांचा टेक्सटाइल पेंटिंगचा एक छोटासा व्यवसाय होता. मात्र त्यांच्या वडिलांच्या एका जवळच्या व्यक्तीने त्यांची फसवणूक केली आणि प्रॉपर्टीसह सगळंच हिसकावून घेतलं. या गोष्टीचा मोठा परिणाम नाना आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झाला. याच घटनेमुळे नाना वयाच्या 13 व्या वर्षापासून काम करू लागले होते. एका जुन्या मुलाखतीत नानांनी सांगितलं होतं की ते चुनाभट्टीत चित्रपटांचे पोस्टर रंगवण्यासाठी आठ किलोमीटर चालत जायचे आणि यायचे. या कामासाठी त्यांना महिन्याला 35 रुपये पगार मिळायचा.
या कठीण काळात त्यांनी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचंही काम केलं होतं. आपल्या मुलांना द्यायला आपल्याकडे काहीच नाही, यामुळे वडील नेहमीच दु:खी असायचे, असं नानांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. जेव्हा नाना 28 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
एका मुलाखतीत नानांना विचारण्यात आलं होतं की नेहमीच रागात का असतात? यावर उत्तर देताना ते म्हणाले, “लहानपणी मी जो काही अपमान सहन केला आणि लोकांची ज्या पद्धतीने वागणूक मिळाली, त्यामुळे कदाचित मी तुम्हाला असं वाटत असेन. नववीच्या क्लासमध्ये मला अपमान आणि भूक या दोन गोष्टींनी इतकं काही शिकवलं की मला कधी ॲक्टिंग स्कूलमध्ये जाण्याची गरजच पडली नाही.”
नाना म्हणायचे की त्यांना लहानपणापासून काम करण्याचं कोणतंही दु:खी नाही, कारण त्यांना आईवडिलांना आनंदी पाहायचं होतं. मात्र लहानपणीच्या काही आठवणींमुळे ते आजही मिठाई खात नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्यांना लहानपणी मिठाई खूप आवडायची. मात्र तेव्हा त्यांना कोणतीही मिठाई खायला मिळायची नाही. याचमुळे त्यांनी मिठाईचा मोह कायमचा सोडला आणि आजसुद्धा ते मिठाई खात नाहीत.