मुंबई : 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंहासन’ या चित्रपटाला नुकतीच 44 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवार, नाना पाटेकर, मोहन आगाशे, जब्बार पटेल, सुप्रिया सुळे असे अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी सिंहासन या चित्रपटाबद्दलचे काही किस्से उपस्थितांनी सांगितले. नाना पाटेकरांनीही या चित्रपटाशी निगडीत काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याविषयीचा मोठा खुलासा केला. नसीरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी मी नवस केला होता, असं ते गमतीशीरपणे म्हणाले.
“सिंहासन या चित्रपटानंतर जब्बार यांनी मला कोणत्याच चित्रपटात घेतलं नाही. मराठीत ते नेहमी मोहन आगाशे यांना घेत. तर हिंदीत श्याम बेनेगल, गोविंद निहलानी हे ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करत. मी खरंच सांगतो की मी देवाला मानत नाही. यामागील कारण म्हणजे नसीरुद्दीन शाह. त्यावेळी मी नसीरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा, त्यांचे हातपाय मोडावेत यासाठी मी बरेच नवस केले होते. जेणेकरून त्यांच्या भूमिका मला मिळतील. पण तो नवस काही पूर्ण झाला नाही. त्यामुळे माझा देवावरचा विश्वासच उडाला”, असं नाना गमतीशीरपणे म्हणाले.
जे ज्याच्या नशिबात असतं ते त्याच्याच पदरी पडतं. नंतरच्या काळात मलाही देवाने खूप काही दिलं, असंही ते पुढे म्हणाले. सिंहासन या चित्रपटातील भूमिकेसाठी नानांना किती मानधन मिळालं होतं, याविषयीही त्यांनी सांगितलं. जब्बार पटेल यांनी त्यांना तीन हजार रुपये मानधन म्हणून दिले होते. त्यावेळी शंभर रुपयांमध्ये घरातील आम्हा चार जणांचं रेशन भरलं जायचं, असं नाना म्हणाले. सिंहासन या चित्रपटात सतीष दुभाषी, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे, निळू फुले, दत्ता भट, नाना पाटेकर, अरुण सरनाईक असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.